विधान परिषद : शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी, जिल्ह्याबाहेरील उमेदवाराला विरोध

shivsena
shivsena

यवतमाळ : यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कोण उमेदवार असेल याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. अद्याप एकाही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने संभ्रमावस्था वाढली आहे. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा परंपरागत असलेला हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ यावेळी महाविकासआघाडीत पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येईल की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच ताब्यात राहील, यावर चर्चा रंगत आहे. दरम्यान, शिवसेनेकडे उमेदवारीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शुक्रवार, ता. 31 जानेवारी 2020 ला होत आहे. मंगळवार, ता. 14 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना अद्याप हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आहे, याबाबतच निश्‍चितता नाही. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत सहा महिन्याच्या आंत निवडून जाणे अनिवार्य आहे. ते विधान परिषद निवडणूक बीडमधून लढतात की यवतमाळमधून यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.

बीड आणि यवतमाळ हे दोन्ही विधान परिषदेचे मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परंपरागत आहेत. डॉ. एन. पी. हिराणी व माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी किमान दोन दशके यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, गेल्यावेळी महाआघाडी सरकारमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे उस्मानबादचे उद्योजक व शिक्षणसम्राट प्रा. तानाजी सावंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली. स्थानिक भाजप-सेना नेत्यांच्या मदतीने त्यांनी विधान परिषद गाठली. मात्र, त्यानंतर त्यांनी जिल्ह्याकडे ढुंकूनही बघितले नाही. वास्तविक, यवतमाळ विधान परिषदेचा मतदारसंघ हा स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून बनला आहे.

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, विजयी झाल्यानंतर मुंबईला गेलेले विधान परिषद सदस्य प्रा. सावंत कधी यवतमाळात कधी फिरकलेच नाहीत. त्यांच्या विकासनिधी किती व कोणत्या कामावर खर्च झाला हे शिवसेना व भाजपच्या नेत्यांशिवाय जनतेला कधी कळले नाही. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवारच देण्यात यावा, अशी जिल्ह्यातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे. नागरिकांचीच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचीदेखील आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, बीडच्या बदल्यात यवतमाळ सोडल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढण्यासाठी माजी आमदार संदीप बाजोरिया उत्सुक आहेत. आणि शिवसेनेला सुटल्यास त्यांचे बंधू कंत्राटदार सुमीत बाजोरिया हेसुद्धा तयारीत आहेत. कॉंग्रेसचे काही नेते पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जरतरच्या परिस्थितीत शिवसेनेला हा मतदारसंघ सुटण्याची दाट शक्‍यता राजकीय नेत्यांकडून वर्तविली जात आहे. शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. शिवाय विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री मदन येरावार यांचीही भूमिका मोलाची असणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. तूर्तास
नागपूरचे एक उद्योजक, मुंबईतील काही नेते आणि सेनेचे माजी आमदार व माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, नेर पालिकेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल आदींचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात पवन जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आठ दिवसांपूर्वी नेर येथील काही नगरसेवकांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन केली. तर, पवन जयस्वाल हे पालकमंत्र्यांच्या गृहमतदारसंघातील असून त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विशेष स्थान आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास राठोड यांना पुढील विधानसभेची निवडणूकही सहज व सोईची राहील, हे कारण पुढे करून उमेदवारी मागितली जात आहे. तर, बाळासाहेब मुनगिनवार हे सेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी सेनेतीलच काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, या निवडणुकीसाठी उमेदवार श्रीमंत असावा, असा प्रघात असल्याने यावेळी पक्षाने श्रीमंत उमेदवाराचा विचार न करता सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, असा विचारही पुढे येत आहे.

शिवसेनेतच उमेदवारीवरून आजही मतमतांतरे दिसून येत आहे. उद्या शिवसेना खासदार भावना गवळी यवतमाळला येत आहेत. त्यांच्याकडूनही उमेदवारांच्या नावाची शिफारस होण्याची शक्‍यता आहे. तर, वनमंत्री संजय राठोड जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. त्यांनाही शिष्टमंडळ भेटण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार मुंबईत उमेदवारीसाठी तळ ठोकून आहेत. पक्षप्रमुख न्याय देतील अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र, स्थानिक नेतृत्वाने डावलले तर बंडखोरी करू असा सूरही त्यांच्याकडून आळवला जात आहे. याबाबत त्यांनी पक्षातीलच एका पदाधिकाऱ्यांशी बोलताना मत व्यक्त केले आहे. पक्ष कुणाच्या नावाचा विचार करतो हे लवकरच कळणार आहे. तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, हे तेवढेच खरे आहे. मात्र, तो उमेदवार जिल्ह्यातील असेल की जिल्ह्याबाहेरील हे लवकरच आजच सांगता येणार नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, आता भाजपकडून नागपूरच्या एका उद्योजकाचे नाव ऐकू येत आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, एकूण राजकीय परिस्थिती पाहता निवडणूकच होईल, असे दिसून येते. तर, चार ते पाच उमेदवार निवडणुकीत राहणार असल्याने निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे. पक्षाबाहेरील श्रीमंतांचा आदर ऐनवेळी उमेदवारी देऊन केला जात असेल तर मग मात्र बंडखोरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मतच माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी व्यक्त केले आहे. अखेर कुणाला मोठे होऊ द्यायचे आणि कुणाचे पंख कापायचे हे नेतृत्वावरच अवलंबून असणार आहे.


'बाहेरच्या श्रीमंत उमेदवाराच्या झोळीत जिल्हा टाकण्यापेक्षा जिल्ह्यातीलच उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी द्यायला हवी. गेल्यावेळी प्रा. तानाजी सावंत यांना आमदार केल्यावर त्यांचा जिल्ह्याच्या विकासात कवडीचाही फायदा झाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी ज्या पक्षाला जागा सुटेल, त्या पक्षाने हा निर्णय घ्यायला हवा. जिल्ह्याच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.'
-देवानंद पवार,
प्रदेशाध्यक्ष (विदर्भ), अ. भा. किसान कॉंग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com