esakal | विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढणार शिवसेना
sakal

बोलून बातमी शोधा

विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढणार शिवसेना

- महिला रूग्णालयाच्या भूमिपूजनावरून भाजप-शिवसेनेत बेवनाव
- शिवसेनेकडून पालकमंत्री डॉ फुके यांचा निषेध 

विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढणार शिवसेना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : नेहमीच भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत आहे. युतीधर्म पाळल्या जात नसल्याने शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी भाजपशी फारकत घेऊन आहेत. युती होऊन जिल्ह्य़ातील एक विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी भाजप विरोधात काम करेल. वेळप्रसंगी विरोधकांशी हातमिळवणी करण्याचे संकेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली तरी भाजपचे काम न करण्याची शपथ भंडारा जिल्हा शिवसेनेने घेतली आहे.

मागील सहा वर्षांपासून रेंगाळत असलेला महिला रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, महिला रूग्णालयाच्या भूमिपूजनावरुन भाजप- सेनेत कलगीतुरा रंगला आहे. पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता भूमिपूजन उरकविल्याचा आरोप करीत शिवसेनेने पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा निषेध केला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप- शिवसेनेतील तणाव वाढत चालल्याने युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलने केली. यात शिवसेना अग्रस्थानी होती. मात्र, भाजपने युतीधर्म न पाळता भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेला विश्वासात घेतले नाही. यामुळे शिवसेनेची तीळपापड झाली आहे. शिवसेनेचे आरोग्यमंत्री असल्याने त्यांनाही साधी विचारणा केली नाही. भाजप-शिवसेनेची युती असताना स्थानिक भाजपचे पदाधिकारी युतीधर्म पाळत नाही, असा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी पालकमंत्र्यांवर निशान साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत युती केली. विधानसभेतही युती राहील, असे भाजपचे नेते सांगतात. मात्र, त्यांच्याकडून युतीधर्म पाळल्या जात नसल्याने शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल, असे संकेत शिवसेनेकडून मिळाले आहे. नव्याने झालेले पालकमंत्री डॉ. फुके यांना राजकारण व मंत्रीपदाचा अनुभव नाही. केवळ त्यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला आहे. त्यांनी शिवसेनेच्या वाटेला जाऊ नये. शिवसेना संपविणार्याची स्थिती काय आहे, याचा अभ्यास पालकमंत्र्यांनी करावा, असा टोला शिवसेनेने लगाविला आहे. भूमिपूजन कार्यक्रम शासकीय असतांना भाजपने कार्यक्रमाला हायजॅक करून श्रेय लाटण्याचा काम केले. यात अधिकार्‍यांवर दबाव आणला. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केल्या जात आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

loading image
go to top