अकोला : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उत्सवाला केवळ वैचारिक रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला नसून, हा उत्सव सर्वधर्मिय व्हावा या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करण्यात आले आहे. त्यासाठी 12 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या विविध कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ऊर्दू शाळा आणि मदरशांमध्ये शिवव्याख्यानाचे आयोजन व शिवाजी महाराजांवरील चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार विचारांनी नटलेली शिवजयंती अकोल्यात साजरी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दरवर्षी 19 फेब्रुवारीला अकोला शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करते. यावर्षी या उत्सवाला वैचारिक रूप देण्याचा प्रयत्न आयोजन समितीतर्फे करण्यात आला. त्यासाठी 12 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात बुधवारी सकाळी 10 वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित वक्तृत्व स्पर्धेने होईल. 13 फेब्रुवारीला शहरातील विविध शाळांमध्ये सकाळी 11 वाजता निबंध स्पर्धा घेण्यात येईल. याशिवाय 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्याने आयोजित केली जातील. 16 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवस्मारक, सहकार नगर, गोरक्षण रोडपर्यंत मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी सकाळी 9.30 वाजता सहकारनगर शिवस्मारक जवळ रंगभरण स्पर्धा व शिवाजी महाराज पार्क येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी 18 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी 8 वाजता महाराणा प्रताप बाग येथून मशाल रॅली काढण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवजन्मोत्सव होईल तर सायंकाळी 8 वाजता बाळगोपाळांकरिता किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष पवन महल्ले, सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले, डॉ. संदीप चव्हाण, विजय कौशल, प्रा. इशाक राही, सौ. संगीता कोरपे, अनिता इंगळे, सरफराज खान, डॉ. दिलावर खान, अमित ठाकरे आदींची उपस्थिती होती.
शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत स्पार्क फाऊंडेशन शस्त्र संग्रह व इतिहास अभ्यासक पंकज रवींद्र दुसाने (अमळनेर) यांच्या संग्रहित शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे करण्यात आले असल्याची माहिती डॉ. अभय पाटील यांनी दिली.
मिरवणूक ठरणार ऐतिहासिक
शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी रोजी शहरातून दुपारी 3 वाजता शोभायात्रा आयोजित केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून या मिरवणुकीला सुरुवात होईल. सर्व अठरापगड जाती धर्माचे नागरिक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. विविध झाँकिया, शैक्षणिक संस्थांचे नेत्रदीपक देखावे, छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा, युद्ध कलांचे प्रात्यक्षिक, गुजरात मधील आखाड्याचे प्रात्यक्षिक, धामणगाव येथील ढोल पथक, शिवकालीन प्रत्याशिक आदी मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. खुले नाट्यगृह येथे मिरवणुकीचा समारोप होणार असून, येथेच सायंकाळी ६ वाजता शिवरायांवरील निवडक लघू चित्रपट प्रदर्शित केले जातील.. संध्याकाळी 8 वाजता शिवव्याख्याते शिवश्री विनोद अण्णा भोसले (परभणी) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.