esakal | गणेशमूर्ती विकणारा शिव राज्याचा "बिग-बॉस'
sakal

बोलून बातमी शोधा

शिव ठाकरे

गणेशमूर्ती विकणारा शिव राज्याचा "बिग-बॉस'

sakal_logo
By
भूषण काळे

अमरावती : लाजाळू स्वभाव.. गोंडस चेहरा.. लहान मुले बोलतात त्याप्रमाणे आवाजातील गोडवा.. डोले-शोले असलेली भरीव शरीरयष्टी.. उत्कृष्ट कलाकार तथा दर्जेदार नर्तक, अशा ख्यातीप्राप्त शिव ठाकरे याने मराठी बिग बॉस सीझन दोनचा विजेता बनून अवघ्या राज्याचा बॉस बनण्याचा बहुमान मिळविला. घरोघरी पेपर टाकणे आणि श्रीगणेशाची मूर्ती विकून त्याने ही उंची गाठली.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्याला पेपर टाकणे आणि मूर्ती विकण्याचे कामही करावे लागले. मात्र बाप्पाची मूर्ती विकणाऱ्या याच शिवला गणरायाने गणेश चतुदर्शीच्या एक दिवस अगोदरच विजेतेपदाचा प्रसाद दिला.
आज अंबानगरीत केवळ शिवचीच चर्चा बघायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मुखात शिवचेच नाव आहे. शिवने अंबानगरीचे नाव अवघ्या राज्यातील घरोघरी पोहोचविल्याने सर्वच स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्याचे वडील मनोहर यांनी सुरुवातीला पानठेलादेखील चालविला. कालांतराने त्यांनी हा व्यवसाय सोडून किराणा दुकान सुरू केले. सध्या ते हाच व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिवला शालेय जीवनापासूनच शिक्षणात फारशी रुची नसल्याने तो नृत्य, नाटक या क्षेत्राकडे वळल्याचे त्याने सांगितले. दहावीपर्यंतचे शिक्षण संत कंवरराम विद्यालयातून पूर्ण केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्‍निक महाविद्यालयातून शिवने डिप्लोमा प्राप्त केला. यानंतर रायसोनी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र नृत्य तथा नाटकाकडे त्याने दुर्लक्ष केले नाही. पॉलिटेक्‍निकला असताना मुलांना नृत्य शिकवायला त्याने सुरुवात केली. सध्या शहरातील 250 मुलामुलींना तो नृत्याचे धडे देत आहे. सुरुवातीपासूनच आई आशा यांची शिवला साथ लाभली. बहीण मनीषा हिचे नुकतेच लग्न झाले. ती पोटे अभियांत्रिकीत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दस्तूरनगरातील नंदनवन कॉलनीत सध्या शिव आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास आहे.
"रोडीज रियालिटी शो'चा फायनॅलिस्ट
शिव हा रोडीजचा विजेता रणविजय यांच्या अत्यंत जवळचा आहे. खुद्द रणविजय यांनी राज्यातील जनतेला त्याला विजयी करण्यासाठी आवाहन केले होते. रोडीज या रियालिटी शोची तीनवेळा मुलाखत दिल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तो रोडीजमध्ये सिलेक्‍ट झाला. इतकेच नव्हे तर त्या सीझनमध्ये फायनल टास्कपर्यंत त्याने मजल मारली होती. तेव्हापासूनच अमरावतीचा उभरता तारा शिव ठाकरेने प्रत्येकाच्या मनात घर केले.

loading image
go to top