दोन नगरसेवकांच्या फितुरीने चंद्रपुरात सेना कार्यकर्त्यांचा राडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मागील पाच दिवसांच्या घडामोडीत सेनेचे दोन्ही नगरसेवक कॉंग्रेससोबत होते. परंतु शेवटच्या क्षणी भाजपला या दोन्ही नगरसेवकांची "किंमत' कळली. दोघांनीही भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाजूनेच हात वर केला. 

चंद्रपूर : चंद्रपूर मनपाच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सेनेच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मिठी मारली. यामुळे संतप्त झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या कार्यालयासमोर चांगलाच राडा केला. त्यांच्या कार्यालयावरील शिवसेनेचा फलक काढून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

दोन नगरसेवकांची फितुरी 

चंद्रपूर मनपात सुरेश पचारे आणि विशाल निंबाळकर हे दोन शिवसेनेचे नगरसेवक आहेत. मागील अडीच वर्ष ते भाजपसोबतच होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. शिवसेना आणि भाजपची तीस वर्षांची युती तुटल्यानंतर राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाशिव आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शेवटच्या टप्प्यात असतानाच सेना आणि भाजपमध्ये सध्या चांगलेच वितुष्ट आले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्याचे पडसाद उमटत आहे. मात्र चंद्रपूर मनपातील सेनेचे दोन्ही नगरसेवक याला अपवाद ठरले. शिवसेनेच्या भूमिकेविरोधात जावून त्यांनी भाजपला मदत केली. 

भाजपच्या छावणीत दाखल 

मागील पाच दिवसांच्या घडामोडीत सेनेचे दोन्ही नगरसेवक कॉंग्रेससोबत होते. परंतु शेवटच्या क्षणी भाजपला या दोन्ही नगरसेवकांची "किंमत' कळली. दोघांनीही भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या काही तास आधी ते मोहुर्लीत पोहोचले आणि भाजपच्या गोटात सामील झाले. मतदानातही त्यांनी भाजपच्या बाजूनेच हात वर केला. 

सेना कार्यकर्त्यांमध्ये रोष 

शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर मात्र शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरला. शहर प्रमुख प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात सेना कार्यकर्ते नगरसेवक सुरेश पचारे यांच्या तुकूम येथील कार्यालयात पोहोचले. संप्तत कार्यकर्त्यांनी पचारे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यांच्या कार्यालयावरील सेनेचा फलक काढून फेकला. पचारे यांची सेनेतून हकालपट्टी करा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे परिसरात चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पचारे कार्यालयात नव्हते. त्यांनी पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत मागितली. थोड्याच वेळात पोलिस तेथे पोहोचले. 

विकासासाठी भाजपसोबत गेलो : पचारे 
मतदान कुणाला करावे, याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही निर्देश आले नव्हते. जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्याशी 11 वाजेपर्यंत संपर्कात होतो. मात्र, त्यांनीही कुठलाही निर्णय दिला नाही. त्यामुळे विकासासाठी भाजपसोबत गेलो, असे पचारे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena workers angree, Two councilors supported bjp in Chandrapur