धक्कादायक: तेलंगणा पळवतोय पाणी, राज्याचे प्रकल्प कागदावरच !

file photo
file photo

सिरोंचा (गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यावर निसर्गाचा वरदहस्त आहे. येथे गोदावरी, इंद्रावती, प्राणहितासारख्या बाराही महिने खळाळणाऱ्या नद्या आहेत. पण, महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे लगतचे तेलंगणा राज्य मेडीगड्डासारखा भव्य प्रकल्प निर्माण करून राज्याच्या हक्‍काचे पाणी पळवत आहे. दुसरीकडे सिरोंचातील उपसा जलसिंचन प्रकल्प सरकारी फायलींमध्येच अडकून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. 

यावर्षी मान्सून लवकर आल्याने पाऊस भरपूर प्रमाणात झाल्याने नदी, नाले भरून वाहत असल्याने जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत आहे. सिरोंचा तालुक्‍याला लागून असलेल्या व बारा महिने भरपूर पाण्याने वाहणाऱ्या तीन नद्या असूनसुद्धा शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागत आहे. सिरोंचा तालुक्‍याच्या सीमेवरून पूर्वेला इंद्रावती, दक्षिणेला प्राणहिता आणि गोदावरी अशा तीन नद्या भरपूर पाण्याने भरून वाहतात. मात्र सिरोंचा तालुक्‍यातून वाहणाऱ्या या नद्यांवर शासनाने एकही जलसिंचन प्रकल्प बांधला नाही. तालुक्‍यात मंजूर असलेले रेगुंठा उपसा जलसिंचन प्रकल्प, पेंटीपाका उपसा जलसिंचन प्रकल्प, झिंगानूर व धर्मपुरी येथील उपसा जलसिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळखात आहेत. तेलंगणा सरकारने 2 मे 2016 रोजीच सिरोंचा तालुक्‍यातील पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीवर 100 मीटर उंची आणि 85 दरवाजे असलेला मेडिगड्डा जलसिंचन प्रकल्प बांधला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्राणहिता नदीचे पाणी मेडिगड्डा प्रकल्पात साठवून आपल्या हक्काचे पाणी तेलंगणा सरकार पळवून नेत असले, तरी आपले लोकप्रतिनिधी आणि सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. गोदावरी नदीवर अनेक जलसिंचन प्रकल्प असल्याने पाण्याची प्रवाह कमी असतो. प्राणहिता नदीला जलसिंचन प्रकल्प नसल्याने पाण्याची पातळी अधिक आहे. या दोन्ही नद्यांचे पाणी मेडिगड्डा जलसिंचन प्रकल्पात साठवून जवळपास 16.17 टीएमसी पाणी कालेश्‍वर जवळील पंपहाऊसमधून तेलंगणा राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येत आहे. मेदक जिल्ह्यातील कोंडापोचम्मा सिंचन प्रकल्पात हे पाणी साठवण्यात येते. तसेच हैदराबाद येथील कारखान्यासाठीसुद्धा याच पाण्याचा वापर होतो. मेडिगड्डा प्रकल्पामुळे तेलंगणा राज्यातील जमिन सुजलाम-सुफलाम बनत असून महाराष्ट्र राज्यातील सिरोंचा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मात्र त्या धरणाचे एक थेंब पाणी मिळत नाही. मेडिगड्डा जलसिंचन प्रकल्पाचे पाणी सिरोंचा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची तहान भागावणार का, असा प्रश्‍न तालुक्‍यातील शेतकरी विचारत आहेत. 

तर 15 हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली 
सिरोंचा तालुक्‍यातील रेगुंठा, पेंटीपाका, झिंगानूर, धर्मपुरी हे चार उपसा जलसिंचन प्रकल्प (लिफ्ट इरिगेशन)पूर्ण झाले, तर तालुक्‍यातील तब्बल पंधरा हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. यातून येथील सिंचनाची समस्या कायमची सुटून शेतकरी समृद्ध होऊ शकतात. हे प्रकल्प सुरू झाले असते , तर तालुक्‍यातील शेतकरी आर्थिक रूपाने बळकट झाले असते. मेडिगड्डा जलसिंचन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारच्या वाट्याला 30 टक्‍के पाणी येते. मात्र हे पाणी उपसण्यासाठी प्राणहिता नदीवर लिफ्ट इरिगेशन अर्थात उपसा सिंचन प्रकल्प नसल्याने आपल्या हक्‍काचे पाणी तेलंगणा सरकार नेत आहे. 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com