‘सिडको’वर बोलण्यास चव्हाणांचा नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने सिडको भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपने आरोप करणाऱ्यांवर पाचशे कोटी रुपयांचा अब्रूनुकसानाचा दावा केला असल्याने त्यांनी बोलण्याचे टाळले असावे, असा तर्क व्यक्त केला जात आहे. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वीच सतराशे कोटींचा भूखंड मुंबईतील बिल्डरांना केवळ तीन कोटी रुपयांमध्ये दिल्याचा आरोप केला होता. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच काँग्रेसने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. खासदार अशोक चव्हाण आज नागपुरात आले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली.

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुरुवारला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सिडको प्रकरणात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यानंतर पुन्हा त्यावर काही बोलणे उचित होणार नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी काहीही बोलणे टाळले.

कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले, राज्याच्या उपराजधानीत गेल्या १०० दिवसांत ६३ खून झाले. धुळे व मालेगाव येथील हत्याकांडात निष्पाप लोकांचे जीव गेले आहे.

यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री स्वतः नागपूर शहरातील असूनसुद्धा पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या राजधानीसोबत उपराजधानीही गुन्हेगारांच्या विळख्यात सापडली असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामात राज्यातील केवळ १८ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. 

Web Title: sidco ashok chavan talking