धरणाच्या पाण्याचा दोन गावांना विळखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : ऊर्ध्व वर्धा धरण प्रकल्पाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने तालुक्‍यातील वरुड बगाजी गावाजवळील निम्न वर्धा प्रकल्पाचे बगाजी सागर धरण भरले आहे. जलसाठ्यात वाढ होत असल्याने या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील धारवाडा व दुर्गवाडा या गावाला पाण्याने वेढले आहे. पाणी गावात शिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रकल्पाच्या निर्मितीनंतर हे धरण पहिल्यांदाच एवढ्या क्षमतेने भरले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याने विळखा घातला असून गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आले. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या कुटुंबांना पुनर्वसित गावातील समाजमंदिरात हलविण्यात आले आहे.
धारवाडा व दुर्गवाडा या गावाच्या मधात पुरातन धारेश्वराचे शिव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसराला पाण्याने विळखा घातला आहे. त्यामुळे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे.
रात्री धरणाचे दरवाजे उघडणार
बगाजी सागर धरणाची पाणी साठवण क्षमता 283.80 दलघमी आहे. सोमवारी (ता.16) हे धरण 283.68 दलघमी क्षमतेने भरले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने आज रात्री 11 वाजता सर्व 31 दारे उघडण्यात येणार असून त्यामधून 90 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होणार आहे, असे निम्न वर्धा पुनर्वसन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी कृष्णा भादे यांनी सांगितले.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये वरुड बगाजी, दिघी महल्ले, नायगाव, सोनोरा, आष्टा, चिंचोली, विटाळा आदी गावांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार भगवान कांबळे यांनी दिली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sink two villages in the dam water