गडचिरोलीतील सिरोंचाची 'हॉट' मिरची चालली नागपुरात कूल' व्हायला...वाचा सविस्तर

Sironcha's hot chillies in Nagpur
Sironcha's hot chillies in Nagpur

सिरोंचा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्हा धानपिकासाठी प्रसिद्ध असला; तरी सिरोंचा तालुक्‍यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पण, येथे शीतगृह नसल्याने येथे मिरची सडत होती. शिवाय कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने मिरची अन्यत्र नेता येत नव्हती. पण, दैनिक 'सकाळ'ने या समस्येला वृत्ताच्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर सरकारने वाहतुकीला परवानगी दिली.

आता ही तिखट 'हॉट' मिरची 'कूल' करायला नागपुरात पाठवण्यात येत आहे. पण, यात शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत असून तालुक्‍यातच शीतगृह निर्माण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. पण काही वर्षांपासून जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी तालुक्‍यात मुख्य धानशेतीसोबतच काही नगदी पिकेही घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पांढरा सोने अर्थात कापूस, मिरची, मका, हळद यासारख्या पिकांचा समावेश आहे. शेतात पिकविलेला कापूस अनेक महिन्यांपासून घरातच साठवणूक करून ठेवल्याने आता काळसर पडत आहे.

कोरोना संसर्गामुळे हा कापूस बाहेर विकता येत नाही. कापूस उत्पादक शेतकरी असे अडचणीत असताना मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्याही समस्या वाढल्या आहेत. सध्या भरघोस पीक झाल्याने भाव गडगडले आहेत. कमी भावात मिरची विकल्यास मोठे नुकसान होणार आहे. पण, या मिरचीच साठवणूक करायला शीतगृहाची गरज असते. ते सिरोंचात नाही. म्हणून सरकारने परवानगी दिल्यानंतर शेतकरी कशीबशी खटपट करून आपले मिरची पीक नागपूरच्या शीतगृहात ठेवण्यासाठी पाठवत आहेत. पण, यातील प्रवासाचा खर्च व शीतकरणाचे भाडे त्यांच्या ऐपतीच्या बाहेर जात आहे.

अहेरी उपविभागासह सिरोंचा तालुक्‍यात दरवर्षी तीन हजार हेक्‍टर जमिनीत मिरची उत्पादन घेतले जाते. मिरची या नगदी पिकाला भाव चांगला मिळत असल्याने सिरोंचा तालुक्‍यातील 80 टक्‍के शेतकरी मिरची उत्पादन घेतात. मात्र, गेल्या वर्षी पिकवलेली मिरची अद्याप शेतकरी विकू शकले नाहीत. त्यात कोरोनाच्या महाभयंकर साथरोगामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेली मिरची तशीच पडून आहे.

दैनिक 'सकाळ'चा पाठपुरावा यशस्वी

त्यामुळे मिरचीचा रंग निघून जात असून ती काळसर पडून सडत आहे. यासंदर्भात दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा बातमीद्वारे ही समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर सरकारने दखल घेत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असतानाही सिरोंचातील मिरची नागपुरातील शीतगृहात ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे शेतकरी कसेबसे मिरची नागपूर येथील शीतगृहात घेऊन गेले. पण, अद्याप या मिरचीला बाजारात उठाव नाही. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात आहेत.

...तर हिंमत कशी करणार?

सरकार शेतकऱ्यांना नगदी पिकांची लागवड करण्याचे आवाहन करते. पण, मिरची किंवा भाजीपाल्यासारखे नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे या पिकांच्या साठवणुकीची कोणतीच व्यवस्था नाही. त्यासाठी शीतगृहांची आवश्‍यकता असते. पण, शीतगृहच नसल्याने भरघोस पीक येऊनही शेतकरी संकटात सापडतात. मग, नवे प्रयोग करण्याची हिंमत कशी करणार, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com