गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमध्ये "आयुर्वेद सखा' बुडाला, गरिबांच्या हंगामी रोजगावरही आली गदा 

गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमध्ये "आयुर्वेद सखा' बुडाला, गरिबांच्या हंगामी रोजगावरही आली गदा 

वेलतूर, (जि. नागपूर) :  विदर्भासाठी संजीवनी म्हणून उभा राहिलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचा फायदा अद्याप तरी दिसत नसला तरी त्यामुळे झालेले हाल सर्वांच्या समोर येत आहेत. गोसेखुर्द धरणाचे बॅक वाटरने वेलतूर परिसरातील "आयुर्वेद सखा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळाचा गोडवा हरवला आहे. यामुळे अनेकांच्या हंगामी व्यवसायावर पाणी फिरल्या गेले आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भावना प्रकल्प बाधित व्यक्त करत आहेत. 
वैनगंगा नदी काठचे स्वच्छ निर्मळ पाणी, मऊशार वाळू, मासे, झाडी व समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध होता. तो काठ, ती झाडी धरणाने हिरावून घेतल्याने अनेक पारंपरिक ग्रामीण व्यवसाय देशोधडीला लागले. त्यातलाच सीताफळाचा एक व्यवसायलाही मोठा फटका बसला आहे. सीताफळाची हजारो झाडे जलसमाधीस्त होऊन नष्ट झाले आहेत. आयुर्वेदात सीताफळाचे अनेक उपयोग सांगून त्याला कल्पतरूची उपमा दिली आहे. सीताफळाची पाने, फुले, बिया, गर, साल हे अनेक रोगावर गुणकारी आहेत त्याला "आयुर्वेद सखा' असेही संबोधले जाते. ही नैसर्गिक झाडेच धरणाचे बॅक वाटरने आज नामशेष झाली आहेत. नवरात्र, दसरा ते दिवाळीच्या कळात सीताफळाचे वन फळांनी लगडलेले असतात. झाडाला नैसर्गिकरित्या पिकलेल्या सीताफळाचे सगळ्यांना आकर्षण असते. लहान थोरापासून गरीब, श्रीमंतापर्यंत साऱ्यांना आवडणारे ते नैसर्गिक फळ आहे. 
कुही तालुक्‍यातील सिर्सी, नवेगाव, तुडका, कोच्छी, प्रतापपूर, पिपरी, मालोदा, आंभोरासह अनेक गावाच्या नदीघाटावर सीताफळाच्या वनराई होत्या. त्याचे विक्रीतून लिलावातून ग्रामपंचायतीला अतिरिक्त आवक मिळत होती. आता ती आवक कायमची थांबली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर फरक पडून गावाचा विकासदर खंडित झाल्याचे मत जानकार परिसर वासी व्यक्त करत आहेत. परिसरातून सीताफळ नागपूर, भंडारा, अड्याळ, पवनी, भिवापूर, उमरेड, मांढळ, तुमसर, गोंदियाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात होते. गोड व चवदार म्हणून ग्राहकांना त्यांनी चागंलीच भुरळ पाडली होती. त्याच्या आठवणी अजूनही काही खरेदीदार न चुकता काढतात. एकेकाळी परिसरातील समृद्धी ओळख असलेला सीताफळाची मागणी असताना हे फळ नामशेष झाले आहे. हे परिसरवासीयांचे दुर्दैव असल्याचे असे मत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनच्या कार्यकर्त्या अर्चना शहारे यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले. 

गावापासून शहरातील स्टार हॉटेलपर्यंत 
सीताफळाचा गोडवा आता गावापासून शहरापर्यंत, टपरी, हॉटेलपासून ते स्टार हॉटेलपर्यंत पोहोचला आहे. प्रसिद्ध शेफ, सुगरण व्यावसायिक बायका सीताफळाचे अनेक पदार्थ बनवून विकू लागले आहेत. अलीकडे त्याची शेती होत असली तरी नदीकाठच्या नैसर्गिक उगवलेल्या सीताफळाची आगळी-वेगळी चव म्हणून खवय्ये त्याला पसंत करतात. मधुमेहग्रस्त तर त्याला त्यांचेसाठीची संजीवनी मानतात. 


नदीकाठच्या गावातील अनेक हंगामी व्यवसाय पुनर्वसन झाल्यावर नष्ट झाले आहेत. ते पुनर्स्थापित करण्यासाठी नव्या गावठाणात एखादी योजना सरकारने राबवावी. 
-दीपक रोहणकर, प्रकल्पग्रस्त, तुडका 
 
सीताफळाचा व्यावसायिक उपयोग आहे. अनेक घरगुती पदार्थ त्यापासून बनविता येतात. बचतगटांना त्यासाठी प्रोत्साहन करावे. 
- सवीता चांदेकर, आभोरा 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com