माता न तूं वैरिणी! मेळघाटात आढळले सहा महिन्यांचे मृत बाळ; अनैतिक संबंधातून जन्मल्याची चर्चा

रमेश मालवीय
Sunday, 24 January 2021

अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. सदरील बाळाबाबत आजूबाजूच्या गावातील पोलिस पाटील व नागरिकांना माहिती दिली आहे.

धारणी (जि. अमरावती) : तालुक्यातील उकूपाटी येथे सहा महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले आहे. धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवले. या घटनेमुळे आरोग्ययंत्रणेत खळबळ उडाली आहे.

धारणी शहरापासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या उकूपाटी जवळील काटेरी झुडूपात बाळ असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे बाळ मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी बाळ फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. सदरील बाळाबाबत आजूबाजूच्या गावातील पोलिस पाटील व नागरिकांना माहिती दिली आहे. लवकरच त्या बाळाच्या माता-पित्याचा सुगावा लागेल. कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A six month old baby was found dead in Melghat at Amravti