दसऱ्याच्या सोन्यासाठी शमी वृक्षांची कत्तल 

शरद शहारे
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

वेलतूर,(जि.नागपूर)  : दसरा उत्सवात सोनं म्हणून वाटण्यासाठी शमी वृक्षाची मोठी कत्तल वेलतूर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून वृक्ष आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

वेलतूर,(जि.नागपूर)  : दसरा उत्सवात सोनं म्हणून वाटण्यासाठी शमी वृक्षाची मोठी कत्तल वेलतूर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून वृक्ष आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
दसरा उत्सवात विक्रीसाठी ही अवैध कत्तल होत असते. जंगलातून कापून आणलेल्या झाडाच्या विविध आकारात फाद्यांची छाटणी करून त्या शहरात चढ्या भावात विकल्या जातात. शमी वृक्षाचे आयुर्वेदात त्यांचे अनेक गुण सांगितले आहेत. कफनाशक, पित्तनाशक म्हणून असलेला त्याचा उपयोग मात्र सर्वत्र माहीत आहे. पुराण ग्रंथातही त्याच्या अनेक कथा आल्या आहेत. रामायण, महाभारतातील उल्लेख त्यांचे भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचे स्थान अधोरेखीत करणारे असेच आहे. महाभारतातील उल्लेखानुसार पाडंवानी वनवासानंतरच्या आपल्या अज्ञातवासाच्या कालात जंगलात याच झाडांवर आपली शस्त्रे लपवून ठेवली होती, व ती शस्त्रे काढण्याचा दिवस दसरा होता. दसऱ्यालाच विजयादशमी असेही संबोधले जाते. यादिवशी प्रभुरामचंद्राने रावणावर विजय मिळवून सीतेची सुटका केली होती. दसरा हा हिंदूचा मोठा व महत्त्वाचा सण आहे. तो सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांची आठवण म्हणून सीमोल्लंघनासाठी जंगलात जाऊन शस्त्रे लुटल्यागत शमी वृक्षाची पाने लुटून ती आप्तस्वकीयांना भेट देण्याची प्रथा आहे. आता प्रथेचे स्वरूप बदलून त्याला "इव्हेंट'चे स्वरूप प्राप्त झाले आहे. सीमोल्लंघनाऐवजी गावातल्या, शहरातल्या एखाद्या मैदानात गोळा होऊन दसरा साजरा केला जातो. त्यासाठी जंगलातून अखंड झाडच आणले जाते व पुढे वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून त्याला लुटून त्याची पाने एकमेकांना शुभेच्छांसह दिली जातात. 

 झाड बुडासह तोडले जात असल्याने आंभोरा परिसरातून शमीची झाडे नामशेष होत आहेत. सोबत त्यामुळे प्राचीन सांस्कृतिक वारसाला गालबोट लागत आहे. हे थांबवून विक्री करणाऱ्यावर कारवाई व्हावी. 
रंजीत कुकसे 
आंभोरा फाउंडेशन 
झाडांची पाने तोडणे म्हणजे झाडाचे कपडे काढण्यासारखे आहे. पानांअभावी प्रकाशसंश्‍लेषणाची प्रक्रिया थांबली जाऊन झाडाला लागणारे अन्न तयार होणे थांबले जाते. परिणामी झाड नष्ट होते. हे दुष्टचक्र थांबले जावे. 
प्रा. तुलसीदास चाचेरकर 
निसर्ग अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slaughter of the Shami tree for the gold of Dasarah