
...अन् चार वर्षीय चिमुकलीला तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चार वर्षीय मुलगी अंगणात घोडागाडीवर बसून खेळत होती. काही वेळात सोळा वर्षीय तरुण तेथे आला. त्याने चिमुकलीकडे घोडागाडीची मागणी केली. परंतु, चिमुकलीने घोडागाडी देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणाने चिमुकलीला लगतच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. विहिरीत असलेल्या पाइपचा चिमुकलीला आधार मिळाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तिचे प्राण वाचविले. गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथे ही थरारक घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, खराळपेठ गावातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये विकास मुडपले हे कुटुंबीयासोबत राहतात. त्यांची चार वर्षीय मुलगी पलक ही अंगणात घोडागाडीवर खेळत होती. ती खेळत असतानाच वॉर्डातील अनिकेत भोयर हा सोळा वर्षीय तरुण तिच्याजवळ आला. काही वेळानंतर त्याने तिला घोडागाडी मागितली. परंतु, पलकने घोडागाडी देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अनिकेतने पलकला घोडागाडीवरून खाली उतरविले व बाजूला असलेल्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले.
विहीर तुडुंब भरून होती. परंतु, विहिरीच्या आत पाईप टाकून होता. पलकने या पाइपचा आधार घेतला व जोराने आवाज दिला. यावेळी परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच तिचा जीव वाचविला. घटनेची माहिती कळताच गावात या थरारक प्रसंगाची चर्चा सुरू झाली. पलकच्या पालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
तरुण थोडासा विक्षिप्त
अनिकेत भोयर हा थोडासा विक्षिप्त आहे. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय खराळपेठच्या गुडपले कुटुंबीयांना या निमित्ताने अनुभवायला मिळाला.