मोहिदेपूर येथील नाथजोग्यांच्या जीवनात अंधारच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

खडसे साहेबांचा आधार
मोहिदेपूर येथील नाथजोगी समाजाला मदतीची आश्वासने देणारे अनेक नेते, अधिकारी फुर्र झाले. सध्या अकोल्यात उपजिल्हाधिकारी असलेले संजय खडसे हे तेवढे आमची विचारपूस करतात. दर दिवाळीला येऊन ते भाऊबीज करतात. नवे कपडे देतात, मिठाई आणतात, आमच्यासोबत सण साजरा करतात. खडसे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय येतात तेवढाच काळ आमच्यासाठी आनंदाचा असतो. तेच खरे आधार वाटतात,असे गावकरी सांगतात.

मोहिदेपूर येथील नाथजोग्यांच्या जीवनात अंधारच!

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : चोर समजून जमावाकडून नागपुरात दगडाने ठेचून हत्या झाल्याच्या घटनेला अर्धे तप उलटूनही अद्याप मोहिदेपूरच्या नाथजोग्यांचे जीवन अंधारातच आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयावरून पाच जणांची हत्या झाल्याची ताजी घटना ही या नाथजोग्यांच्या हत्येच्या घटनेची पुनरावृत्तीच आहे. त्यामुळे सध्या मोहिदपुरात पुन्हा भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.  

९ मे २०१२ रोजी नागपूर येथे चोर समजून जमावाने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूरच्या तीन नाथजोग्यांची सामूहिकपणे अमानुष हत्या केली होती आणि अन्य एक गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी अनेक राजकीय पुढारी, शासकीय अधिकाऱ्यांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी, घरकुलाचे आणि ठोस आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, आज या घटनेला अर्धे तप उलटूनही मृतांचे वारस वरील मदतीच्या प्रतीक्षेत जगत असल्याचे विदारक चित्र आहे.  

बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथे नाथजोगी समाजाची वसती आहे. संपूर्ण राज्यभरात बहुरूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात व भिक्षा मागून ही मंडळी उदरनिर्वाह करतात. सहा वर्षांपूर्वी नागपुरात चोर समजून जमावाने हसनराव दादाराव सोळंके, सुपडा मगन नागनाथ, पंजाबराव भिकाजी शिंदे आणि पंजाबराव लक्ष्मण सोळंके या चौघा बहुरूप्यांवर हल्ला चढविला होता. त्यात तिघे ठार झाले तर पंजाब सोळंके हे गंभीर जखमी झाले होते. ते अद्यापही गंभीर अवस्थेत असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यावेळी बुलडाण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिदेपुरातील मृतकांच्या कुटुंबीयांना घरकुल देण्याचे व नोकरीचे आश्वासन दिले होते. हे गावच दत्तक घेण्याच्या घोषणा झाल्या. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे त्यावेळी गावात एका महिन्यात दोनवेळा येऊन गेले. मृतकांच्या प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजारांची मदत केली व योग्य पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते, आज ते केंद्रात सत्तेवर असताना त्यांना मोहिदेपूरचा विसर पडल्याचे गावकरी म्हणतात.

मोहिदेपूर येथे मृतकांच्या कुटुंबीयांना भेट दिली असता, त्यांची कुटुंबे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. मोडक्या-तोडक्या घरात राहून घरकुलाचे स्वप्न कधी पूर्ण होईल याची प्रतीक्षा करीत आहेत. संगीता हसन सोळंके यांच्यावर तीन मुली व वृद्ध सासूची जबाबदारी आहे. सयाबाई पंजाबराव शिंदे यांच्यावर तीन मुली व वृद्ध सासऱ्याची जबाबदारी आहे. मृतक पंजाबरावचे वडिल भिकाजी शिंदे म्हणाले, दुर्घटनेच्या महिनाभरापर्यंत अधिकारी, नेत्यांचा महापूर आला. आता एकमेव अकोल्याचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे दिवाळीला येऊन विचारपूस करतात. इतर सर्व कुठे गायब झाले माहिती नाही. गावातील इतर लोकांना आता तरी मृतांच्या कुटुंबीयांना ठोस मदत करावी आणि जखमी पंजाबराव लक्ष्मण सोळंके यांच्यावर सरकारी खर्चाने उपचार व्हावेत एवढीच अपेक्षा आहे. आजही त्यांचा जीवनातील अंधार कायम असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

परिस्थिती जैसे थे
मोहिदेपूरातील त्या कुटुंबीयांना शासनस्तरावरून काही आर्थिक मदत झाली ही ती फिक्स डिपॉझिट स्वरूपात बँकेत आहे. त्याच्या व्याजावर सध्या या कुटुंबांचा खर्च चालतो. मात्र, ती मदत पुरेसी नाही. अद्याप या कुटुंबांकडे धड घरे नाहीत. अन्य सुविधाही नाहीत. त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता नाही. त्यांचे जीवन अंधारात आहे, असे या भागातील कार्यकर्ते नीलेश वानखडे यांनी सांगितले.

खडसे साहेबांचा आधार
मोहिदेपूर येथील नाथजोगी समाजाला मदतीची आश्वासने देणारे अनेक नेते, अधिकारी फुर्र झाले. सध्या अकोल्यात उपजिल्हाधिकारी असलेले संजय खडसे हे तेवढे आमची विचारपूस करतात. दर दिवाळीला येऊन ते भाऊबीज करतात. नवे कपडे देतात, मिठाई आणतात, आमच्यासोबत सण साजरा करतात. खडसे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय येतात तेवढाच काळ आमच्यासाठी आनंदाचा असतो. तेच खरे आधार वाटतात,असे गावकरी सांगतात.

Web Title: Social Issue Jalgaon Jamod

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top