Video : ऐ वतन, मेरे वतन आबाद रहे तु...सुटीवर आलेला जवान देतोय सैन्य भरतीचे धडे

sainik
sainik

शेंदोळाखुर्द (अमरावती) : अक्षयकुमारचा हॉली डे चित्रपट पाहिलेल्यांना आठवत असेल की आर्मीत असलेला अक्षयकुमार सुट्टीवर घरी आलेला असतानाही दहशतवाद्यांशी यशस्वीपणे लढा देतो. देशसेवेचे हा जज्बा सैन्यातील जवानांमध्ये असतोच. आणि ते सैन्यातील नोकरी नोकरी म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करीत असतात.

याचा अनुभव देणारा प्रसंग अमरावती जिल्ह्यात घडला.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला एक जवान सुटीत गावात आला. तो मेळघाटच्या आदिवासीबहुल भागात युवकांना सैन्यदलात दाखल होण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे महत्त्वाचे कार्य करतो आहे.

तिवसा तालुक्‍यातील आदर्श गाव शेंदोळाखुर्द येथील जवान नायक सुधीर भीमराव वानखडे हे भारतीय सैन्यदलामध्ये 18 मॅक इन्फ्रन्ट्री या तुकडीमध्ये कार्यरत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस ते गावाकडे सुटीवर आले. लॉकडाउनमुळे त्यांच्या सुट्या वाढल्या. त्यांची पत्नी दीपाली वानखडे या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्या सध्या चिखलदरा तालुक्‍यातील सलोना प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या बोराळा उपकेंद्रात सेवा देत आहेत. त्यामुळे नायक सुधीर वानखडे यांनी त्यांच्या सुट्या बोराळा येथे घालविणे पसंत केले.

गावामध्ये सुरुवातीचे चार ते पाच दिवस घालविल्यानंतर त्यांच्या असे लक्षात की गावातील चार ते पाच तरुण हे दररोज धावतात, शारीरिक कसरती करतात आणि बाकीचे तरुण मोबाईलसह चौकाचौकामध्ये गप्पा मारण्यात गुंग असतात. मग सराव करणाऱ्या या तरुणांना भेटून त्यांना मोफत सैन्यभरतीसाठी लागणारे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी तरुणांपुढे ठेवला. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य व क्रीडांगण स्वत: सुधीर वानखडे यांनी स्वखर्चातून व युवकांच्या मेहनतीने तयार करून घेतले.



हळूहळू प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांची संख्या वाढत गेली. आज गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील 30 युवक व 5 युवती, असे एकूण 35 जण प्रशिक्षण घेत आहेत. दररोज प्रशिक्षणाचा कालावधी 5 तासांचा आहे. यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, पुशअप, सीटअप, स्प्रिंट, स्क्रोलिंग, दोराने चढणे- उतरणे आदींचा समावेश आहे. साधारणत: दोन महिन्यांपासून या युवकांना सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या मुलांमध्ये श्‍याम सुनील जावरकर व दुर्गेश कृष्णा काळे हे दोन युवक राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू आहेत. लेखी परीक्षेची तयारी युवक स्वत: करतात. परंतु त्यांना गावामध्ये वाचनालय आणि जीम उपलब्ध नाही. या प्रशिक्षणामुळे गावामध्ये चांगले वातावरण तयार झाले आहे. नायक सुधीर वानखडे हे या प्रशिक्षणाबरोबरच युवकांना अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी व गावामध्ये एकता निर्माण व्हावी, यासाठी प्रबोधन करतात व दीपाली वानखडे या लोकांना आरोग्यसेवा देतात.

वाचनालयाची व्यवस्था व्हावी
आम्ही आधी चार-पाचजण धावण्याचा सराव करीत होतो. परंतु आम्हाला दम लागत होता. सुधीर वानखडे यांनी प्रशिक्षण दिले तेव्हापासून दम लागत नाही. या प्रशिक्षणाचा आम्हाला चांगलाच लाभ झाला आहे. शासनाने येथे वाचनालय तसेच जीमची व्यवस्था करून द्यावी.
श्‍याम जावरकर, प्रशिक्षणार्थी.

सविस्तर वाचा - दहावी निकाल! अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा अव्वल

गावातील लोकांची सेवा
मी गावाकडे सुटीवर आलो. गावातील तरुणांना सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण देण्याची कल्पना मला सुचली. मी युवकांना भेटलो व त्यांच्यापुढे तसा प्रस्ताव ठेवला. त्यांना ते पटले. सुरुवातीला चार ते पाच युवक यायचे. आज गावातील व आजूबाजूच्या परिसरातील 30 ते 35 युवक-युवती प्रशिक्षण घेतात. मला असा विश्‍वास आहे की यातील 10 ते 12 युवकांची पोलिस तसेच सैन्यभरतीमध्ये निवड होईल. माझ्या परिने मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही गावातील लोकांची सेवा करीत आहोत.
सुधीर वानखडे.
नायक

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com