file photo
file photo

बापरे! सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने थकविले ३६ लाखांचे देयक, महावितरणने बजावली नोटीस

सिहोरा (जि. भंडारा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाकडे महावितरणच्या देयकांची थकबाकी वाढली आहे. यामुळे महावितरणने थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे. प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता असली; तरी प्रकल्पाचा वीजपुरवठा सुरू राहावा याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून चांदपूर जलाशयात पाणी साठवले जाते. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी चांगल्याप्रकारे पाण्याचा उपसा केल्याने चांदपूर जलाशयाची स्थिती सुधारली आहे. यात यांत्रिकी विभागाने आपले कसब पणाला लावले होते. एरव्ही ३ ते ४ पंपाने उपसा होत होता. या वर्षी मात्र, निरंतर आठ पंपांनी उपसा करण्यात आला आहे. या प्रकल्पात वीज, सुरक्षा आणि पंपगृहाची कामे इ-निविदा पद्धतीने केली जातात. त्यावर पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून नदीपात्रातून पाणी उपसा सुरू आहे. दरम्यान, खरीप हंगामात पिकांसाठी जलाशयाचे पाणी वितरण करण्यात आले. यामुळे जलाशयात पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, पुन्हा नदीपात्रातून पाणी उपसा केल्याने चांदपूर जलाशय तुडुंब भरले आहे. आता उन्हाळी धान लागवडीसाठी शेती ओलिताखाली आणता येईल, इतके पाणी जलाशयात आहे. परंतु, रोटेशन पद्धतीने पाणी वाटप केले जाणार आहे.

तीन महिने पाण्याचा उपसा

अनेक वर्षांपासून असणारा करार तोडता येणार नाही. यामुळे तीन नोव्हेंबरला बैठक आयोजित केली होती. दरम्यान, पावसाळ्यापासून प्रकल्पाने तीन महिने सतत उपसा केला आहे. त्याबाबत महावितरणचे ३६ लाख ९० हजार ४५० रुपयांचे बिल धडकले आहे. थकबाकीचा आकडा फुगला असल्याने वसुलीसाठी महावितरणने नोटीस बजावली आहे.

वीजपुरवठा खंडित होणार नाही

कोरोना काळात राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने शासनस्तरावरून सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी चर्चा आहे. त्यावर तोडगा काढला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महावितरणने नोटीस दिले असले; तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

पाणीपट्टी कराची वसुली चर्चेत येणार

चांदपूर जलाशयाच्या उजवा आणि डावा कालव्यात समावेश असणारे १२ हजार हेक्‍टरचे सिंचन केले जाते. तसेच उन्हाळी पिकाचे क्षेत्र २ ते ३ हजार हेक्‍टर ओलिताखाली आणले जाते. डावा आणि उजवा कालव्यांतर्गत शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी कराचे २५० कोटी रुपये थकीत आहेत. पाण्याकरिता ओरड करणारे शेतकरी थकीत पाणीपट्टी कराचे देयक देण्यास पुढाकार घेत नाही. तशी मानसिकता तयार करण्याची गरज आहे.


चार गावाचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करताना उजव्या कालव्यांवरील बोरगाव, सिहोरा, सिलेगाव, वाहणी, सितेपार गावांचे शिवार वगळले होते. या गावांना पाणीवाटप कधी होईल? हे सांगता येत नाही. यामुळे जलाशय तुडुंब भरले असताना या गावांना पाणी वितरणात विचार झाला पाहिजे होता. मात्र रोटेशन पद्धतीमुळे डावा कालव्याद्वारे पाणीवाटपाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या गावांना पाणीवाटपाकरिता माजी सभापती धनेंद्र तुरकर आग्रही होते. परंतु, तसा सकारात्मक निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला नाही. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com