"स्पीच थेरपी'ने मुलांत सकारात्मक बदल

सूरज पाटील
Wednesday, 24 June 2020

कोरोना संकटाला रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात अनेक घरांत लहान मुले आहेत. या मुलांकडे बारकाईने पालक, आजी,  आजोबा लक्ष देत आहेत. याचवेळी मुलांमधील त्रुटीही लक्षात येत आहेत.

 

यवतमाळ  : लॉकडाउनच्या काळात अवघे कुटुंब एकत्र आल्याचे चित्र  बघायला मिळते. या काळात मुलांमधील त्रुटी पालकांच्या लक्षात येताहेत. अडखळत बोलणे, तोतरे बोलणे, ऐकायला न येणे या बाबी  पालकांच्या लक्षात आल्यामुळे आमचे मार्गदर्शन घेत आहेत.

‘स्पीच थेरपी’मुळे मुलांमध्ये  सकारात्मक बदल घडून येत असल्याचे मत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयातील स्पीच थेरपिस्ट तथा ऑडिओलॉजिस्ट नीता मेश्राम यांनी "सकाळ'शी  संवाद साधताना व्यक्त केले.

कोरोना संकटाला रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात अनेक घरांत लहान मुले आहेत. या मुलांकडे बारकाईने पालक, आजी,  आजोबा लक्ष देत आहेत. याचवेळी मुलांमधील त्रुटीही लक्षात येत आहेत. पालक नोकरी,  कामात व्यस्त राहत असल्याने आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही.  परिणामी मुलांमध्ये काय त्रुटी आहेत, हे लक्षात येत नाही.

एखाद्या वेळेस ही बाब लक्षात आली तरी "बोलता बोलता बोलेल' असे म्हणून दुर्लक्ष केले  जाते. मात्र, त्यातून मुलांमध्ये एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. कोरोना विषाणूच्या  काळात कधी नव्हे, ते कुटुंब एकत्र आहे. त्यांना आपल्या मुलांबरोबर बराच वेळ घालवायला  मिळत आहे. या काळात मुलांमधील चांगले गुण व त्रुटी पालकांच्या निदर्शनास येत आहेत.

कुणी मुले चांगले चित्र काढतात. नवीन कलाकृती करून बघत आहेत. चांगले गीत गात  आहेत. कवितादेखील करीत आहेत. तर, काही मुले दिवसभर टीव्हीसमोर बसून कार्टून  बघत राहतात. टीव्ही बंद केल्यास चिडचिड करतात. लवकर राग येतो. काही मुले  अजिबात बोलत नाहीत. असेदेखील चित्र आहे. घरातील हे चित्र बघून पालकांनी वेळीच  सावध झाले पाहिजे. म्हणजे उद्याची पिढी आपण सक्षमपणे उभे करू शकतो. लहान  मुलांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांची आणखी प्रगती करता येते.

हेही वाचा : या जिल्ह्यातील शेकडो नक्षलग्रस्त दुर्गम गावांत विजेचा लपंडाव सुरूच

 
बोलण्यात व चुकीच्या वागणुकीत असलेल्या त्रुटीला स्पीच थेरपीच्या माध्यमातून आळा  घालता येऊ शकतो. मुले पाच वर्षांनंतर स्पष्ट बोलतात, हा पालकांचा समज चुकीचा आहे.  लॉकडाउनच्या काळात पालक आमच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मुलांमधील उणिवा बोलून  दाखवीत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. वैद्यकीय महाविद्यालयात बोलावून  थेरपी टेक्‍निक सांगितले जाते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

अडखळत बोलणे, कमी ऐकू येणे, तोतरे बोलणे आदी मुलांच्या त्रुटींवर स्पीच थेरपीच्या  माध्यमातून उपचार केले जातात. कोरोनाच्या काळात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष  द्यायला अधिक वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही बाबी पालकांच्या लक्षात येत असल्याने  फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून समस्या निकाली काढण्यात मदत होत आहे.
नीता मेश्राम,
स्पीच थेरपिस्ट तथा ऑडिओलॉजिस्ट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Speech therapy" has positive changes in children