लॉकडाउनमुळे क्रीडा प्रशिक्षकांवर आर्थिक संकट

श्रीकांत पेशट्टीवार
गुरुवार, 2 जुलै 2020

लॉकडाउनमुळे मागील तीन महिन्यांपासून क्रीडासंकुल बंद असल्यामुळे संकुलावरील खेळाचे सराव पूर्णतः बंद पडले. खेळाडूंना शिकवून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा क्रीडा प्रशिक्षकांना मोठा आधार असतो. मात्र, हाच आधार लॉकडाऊनने हिरावून घेतला आहे. त्यामुळे क्रीडा प्रशिक्षकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

चंद्रपूर  : कोरोना विषाणूमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसला. यातून क्रीडा प्रशिक्षकही सुटले नाहीत. जिल्हा क्रीडासंकुलावर क्रीडा प्रशिक्षक खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण देतात. लॉकडाउनमुळे मागील तीन महिन्यांपासून क्रीडासंकुल बंद असल्यामुळे संकुलावरील खेळाचे सराव पूर्णतः बंद पडले. खेळाडूंना शिकवून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा क्रीडा प्रशिक्षकांना मोठा आधार असतो. मात्र, हाच आधार लॉकडाऊनने हिरावून घेतला आहे. त्यामुळे क्रीडा प्रशिक्षकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

शहरातील जिल्हा क्रीडासंकुलात जलतरण, कराटे, टेबलटेनिस, जिमनॅस्टीक, आर्चरी, बॉक्‍सिंग, स्केटिंग, व्हॉलिबॉल, बॉस्केटबॉल यासह अन्य खेळ खेळण्याची सुविधा आहे. त्यातील जलतरण, स्केटिंग याचे दरवर्षी कंत्राट निघते. कंत्राटाची रक्कम भरून क्रीडा प्रशिक्षक आपली वेळ ठरवून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत समर कॅम्पचे आयोजन केले जाते. या समर कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर मुले सहभागी होतात. यातून क्रीडा प्रशिक्षकांना आर्थिक आधार मिळतो. यंदाही विविध क्रीडा प्रशिक्षकांनी समर कॅम्पचे नियोजन केले होते. मात्र, कोरोना विषाणूने घात केला. मार्च महिन्यांपासून टाळेबंदी जाहीर झाली आणि समर कॅम्पच्या नियोजनावर पाणी फेरले गेले.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून क्रीडासंकुलाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असले तरी खेळांच्या जागेवर सध्या कुठलेच काम सुरू नाही. त्यामुळे समर कॅम्पसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मैदानच बंद पडले. त्याचा मोठा फटका क्रीडा प्रशिक्षकांना बसत आहे. तीन महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे ग्राउंडच बंद पडले आहे.

जिल्हा क्रीडासंकुलावर विविध खेळ शिकविणारे बहुतांश क्रीडा प्रशिक्षक हे खासगी कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत आहे. तेथे त्यांना दहा -बारा हजार रुपये मानधन मिळते. सध्या लॉकडाउन असल्याने शाळा, कॉन्व्हेंट अजूनही सुरू झाले नाही. कॉन्व्हेंट, शाळा सुरू झाल्या नसल्या तरी क्रीडा प्रशिक्षकांना दररोज जावेच लागते. तीन महिन्यांपासून या क्रीडा प्रशिक्षकांना अर्धेच वेतन देत आहे. लॉकडाउन संपून मैदान पूर्ववत सुरू व्हावे, अशी अपेक्षा या क्रीडा प्रशिक्षकांची आहे.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

क्रीडा प्रशिक्षक नियमांचे पालन करतील
लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. क्रीडा प्रशिक्षकांनाही त्यातून थोडीबहुत सवलत शासनाने द्यावी. शासनाचे जे काही नियम असतील त्याचे पालन क्रीडा प्रशिक्षक करतील. लॉकडाउनमुळे सध्या क्रीडा प्रशिक्षकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कुंदन नायाडू
आंतरराष्ट्रीय खेळाडू चंद्रपूर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports teacher are in financial crisis due to lockdown