सोयाबीन शेंगांना फुटले कोंब; यंदाही नगदी पीक मातीमोल 

file photo
file photo

पुसद (जि. यवतमाळ) : सोयाबीनला नगदी पीक म्हटले जाते. पण पिकले तर सोन्यासारखे अन्‌ बुडाले तर धुयधानी. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हाच अनुभवला आला आहे. कशाबशा झाडांना भरघोस शेंगा लगडल्या. मात्र, वातावरणातील बदलामुळे चक्क सोयाबीनच्या हिरव्या शेंगातून कोंबे निघालीत. 
शेतकऱ्यांना पहिला मार सोयाबीन बियाण्याने दिला. पावसाची साथ मिळत असताना कीडीने हल्ला केला. चक्रीभुंगा, खोडकिड, येलो मोझॅक, मर अशा रोगांनी सोयाबीन पिकाला जंग जंग पछाडले. विपरीत परिस्थितीत सोयाबीन पीक टिकून राहिले. शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पावसाळी वातावरणामुळे आर्द्रता निर्माण झाली व या अर्धवट परिपक्व हिरव्या शेंगाच्या दाण्यांतून कोंब बाहेर आले. या कोबांना पालवीही फुटली. मोठ्या प्रमाणात शेतकरी हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत आहे. 


या प्रकाराने जिल्ह्यातील सव्वातीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला मोठा झटका बसला आहे. पुसद कृषी उपविभागातील पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव या तालुक्‍यातील परिस्थिती चिंताजनक आहे. महागाव तालुक्‍यातील वनोली या शेवटच्या टोकावरील किशोर जाधव यांच्या ११ एकर क्षेत्रात प्रत्येक झाडावरील सोयाबीन शेंगांना कोंब फुटल्याने ते हबकून गेले आहे. मनोहरनगरचे वसंत धवस, बोरी ईजाराचे पवन पोरजवार, माळपठारावरील हिवळणी तलावचे भारत जाधव, काळी दौलतखानचे साहेबराव पाटील अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेंगांना कोंब फुटल्याच्या तक्रारी आहेत. 'उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटताना पहात आहे', अशी प्रतिक्रिया वसंत धवस यांनी व्यक्त केली. आता कोंब फुटल्याने सोयाबीन जनावरांना खाऊ घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे बोरीचे रवींद्र राठोड म्हणाले. सोयाबीन शेंगांना कोंब फुटण्याच्या या सार्वत्रिक प्रकाराने सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

कृषी सचिवांचे लक्ष आहे!
यवतमाळ जिल्हाच नव्हे तर विदर्भातील वर्धा, वाशिम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांशिवाय नांदेडसह सोयाबीन पट्ट्यात शेंगांची हीच परिस्थिती आहे. सततच्या पावसामुळे लवकर येणाऱ्या सोयाबीनच्या जातीमध्ये शेंगांना कोंब येण्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आला आहे. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ पाहणी करीत आहेत. सततच्या पावसामुळे 'सायकल ब्रेक' न झाल्याने हा प्रकार घडला आहे. या प्रकाराकडे माझे लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केली. 

सततच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्‍यात आले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पैसेवारी काढताना सोयाबीनच्या नुकसानीचा अंतर्भाव करण्यात यावा व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
- देवानंद पवार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेस.


वागद (ईजारा) येथील विनोद राठोड यांच्या शेतात महाबीज ३३५ बियाण्यांच्या सोयाबीन पिकाच्या प्रत्येक झाडावरील अपरिपक्व व हिरव्या शेंगातून कोंब फुटलेले आहे. विशेष म्हणजे पिवळ्या व सुकलेल्या शेंगामध्ये हा प्रकार दिसत नाही. हा प्रकार नेमका काय आहे, याबद्दल कृषिशास्त्रज्ञच सांगू शकतील.
- विजय मोकाडे, तालुका कृषी अधिकारी, महागाव

सोयाबीनच्या हिरव्या शेंगातून कोंब फुटण्याचा प्रकार प्रथमच दिसत आहे. सोयाबीनच्या संपूर्ण क्षेत्रात हा प्रकार असून कमी व जास्त दिवसांच्या दोन्ही सोयाबीन जातीत आढळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे. शेतकरी अस्वस्थ आहे.
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com