ती नटून-थटून झालीय सज्ज, फक्त आदेशाचीच पाहतेय वाट...

ST BUS
ST BUS

अमरावती : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची, सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी असणारी आपली लालपरी म्हणजेच एसटी बस लवकरच अमरावतीच्या रस्त्यांवर धावणार आहे. लालपरीसाठी आगार व्यवस्थापकांसह चालक-वाहकांनासुद्धा सज्ज करण्यात आले असून येत्या आठवड्यात लालपरी रस्त्यांवर धावणार आहे. 

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे समाजातील सर्वच घटकांसोबतच एसटी महामंडळाच्या बसलाही मोठा फटका सहन करावा लागला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून म्हणजेच 23 मार्चपासून एसटी बसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. आगारसुद्धा बंद आहेत. जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेर प्रवासास बंदी असल्याकारणाने प्रवाशांनीसुद्धा एसटीकडे पाठ फिरविली. नाइलाजाने एसटीचा प्रवास बंद झाल्याने त्याचा फटका महामंडळाला बसला.

अमरावती जिल्ह्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्वच आगार मिळून दररोज जवळपास 2600 एसटीच्या फेऱ्या होत होत्या. विशेष म्हणजे दररोज महामंडळाला 30 ते 35 लाखांचे उत्पन्नसुद्धा नियमितपणे मिळत होते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीला डिझेलचा खर्च काढणेसुद्धा मुश्‍किल झाले आहे. लॉकडाउनमुळे प्रवासी नसल्याने एसटीने मालवाहक सेवा सुरू केली. अमरावती शहर रेडझोनमध्ये असल्याने तालुक्‍याच्या आगारांमध्ये एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रवासी नसल्याने या फेऱ्या तोट्यात चालताहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचा हवाला देत दोनच दिवसांपूर्वी एसटी सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मात्र, त्या कशा सुरू कराव्या, अमरावती शहरात प्रवेशाला अनुमती आहे काय, येथील स्थानक सुरू करता येईल काय, असे काही प्रश्‍न असल्याने अद्याप एसटी बस सुरू झालेल्या नाहीत. मात्र परिवहन महामंडळाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून येत्या आठवड्याच्या आताच एसटी सेवा अमरावतीत सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 

चालक-वाहक सज्ज 

सोमवारपासून एसटी फेऱ्या सुरू होणार नाहीत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांत एसटी फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यासाठी चालक-वाहकांच्या ड्युट्या लावण्यात आलेल्या असून बसेससुद्धा सज्ज आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पत्रामध्ये काही शंका आहेत. मंगळवारी आम्ही त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर एसटी सुरू करण्यात येईल. तूर्तास अमरावती वगळता सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी बसच्या मर्यादित फेऱ्या सुरू आहेत. एसटी सोडण्यास आमचे अधिकारी व कर्मचारी तयार आहेत. 
-श्रीकांत गभणे, प्रादेशिक व्यवस्थापक, अमरावती परिवहन विभाग. 
 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com