गोष्ट एका अनोख्या लग्नाची! अकाली वैधव्य आलेल्या सुनेचे सासरच झाले माहेर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

सुनेचे आभाळाएवढे दु:ख पाहून ते दूर करण्याच्या दृष्टीने तिचे भासरे रवींद्र लाखोडे यांनी पुढाकार घेऊन लहान भावाच्या पत्नीला म्हणजेच सुनेला मुलगी मानून तिचा विवाह करण्याचा विचार केला. रजनी यांचा पुनर्विवाह अंजनगावसुर्जी येथील रहिवासी सुभाष महादेवराव सावरकर यांच्याशी मोर्शी येथे वैदिक व नोंदणी पद्धतीने पार पडला.

मोर्शी(जि. अमरावती) : सासरी गेलेल्या सुनेच्या छळाच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. कधी शारीरिक-मानसिक छळाच्या, तर कधी हुंड्यासाठी झालेल्या आत्महत्येच्या. मात्र अजूनही समाजाची संवेदनशीलता जागृत आहे, हे दर्शविणाऱ्या घटना बोटावर मोजण्याइतक्‍याच असतात. अशीच एक आदर्श घटना नुकतीच घडली. चक्‍क विधवा झालेल्या सुनेचे तिच्या सासरच्यांनी तिला लेक समजून पुन्हा लग्न लावून दिले. आणि या घटनेने संवेदनशील समाज गहिवरला.

मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याच्या विधवा पत्नीचा म्हणजे आपल्या सुनेचा विवाह लावून देत सासरच्यांनी नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. मोर्शी येथील इंदिरानगरात राहणाऱ्या लीलाबाई चंपतराव लाखोडे यांचा लहान मुलगा सुरेंद्र लाखोडे यांचे 12 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी रजनी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सुनेचे आभाळाएवढे दु:ख पाहून ते दूर करण्याच्या दृष्टीने तिचे भासरे रवींद्र लाखोडे यांनी पुढाकार घेऊन लहान भावाच्या पत्नीला म्हणजेच सुनेला मुलगी मानून तिचा विवाह करण्याचा विचार केला. रजनी यांचा पुनर्विवाह अंजनगावसुर्जी येथील रहिवासी सुभाष महादेवराव सावरकर यांच्याशी मोर्शी येथे वैदिक व नोंदणी पद्धतीने पार पडला.

सासरच्या लोकांनी आपल्या विधवा सुनेला मुलगी मानून आणि तिच्या पुढील जीवनाचा विचार करून योग्य स्थळ शोधून तिच्या संमतीने, तिच्या पसंती-नापसंतीचा विचार करून योग्य व्यक्तीशी सर्व सोपस्कार पार पाडून तिचे लग्न लावून दिले. रवींद्र लाखोडे सोबतच त्यांचे लहान भाऊ राजेंद्र लाखोडे, आई लीलाबाई लाखोडे आणि त्यांची बहीण पूर्ती गायकवाड, दुर्गा पिढेकर, वंदना लाखोडे तसेच राजेंद्र यांचे मित्र भूषण कोकाटे, प्रभागाच्या नगरसेविका वैशाली कोकाटे यांनी हा आदर्श विवाह पार पाडला.
सविस्तर वाचा - अलिकडे भरत नाही कावळ्यांची शाळा! संख्याही झाली कमी, हरवतेय "काव काव
या विवाहामुळे समाजापुढे एक आदर्श ठेवण्यात आला. मुलगी व सून, असा भेदभाव समाजात राहणार नाही, असे मनोगत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी मोर्शीतील सामाजिक कार्यकर्ते भूषण कोकाटे, डोहोर समाज संघटनेचे जिल्हा संघटक सचिन वाटकर, विजय सावरकर, कमलाकर पिढेकर, मनोहर गायकवाड, दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते भारत सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of one Ideal marriage