परतवाड्यात तणाव ; दगडफेकीत दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

परतवाडा (अमरावती : शहरातील टिंबर डेपो भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीची सोमवारी (ता. 30) भरदिवसा हत्या झाल्याने त्याचे पडसाद शहरभर उमटले व तणाव निर्माण झाला. यादरम्यान संतप्त जमावाच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली असून परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांसह मोठा ताफा परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे परतवाडा शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

परतवाडा (अमरावती : शहरातील टिंबर डेपो भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीची सोमवारी (ता. 30) भरदिवसा हत्या झाल्याने त्याचे पडसाद शहरभर उमटले व तणाव निर्माण झाला. यादरम्यान संतप्त जमावाच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली असून परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांसह मोठा ताफा परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे परतवाडा शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
परतवाडा शहरात श्‍यामा पहेलवान म्हणून ओळख असलेले श्‍याम रघुवीर खोलापुरे-नंदवंशी (वय 39, रा. महावीरचौक, परतवाडा) यांचा सोमवारी (ता. 30) दुपारी 11 वाजताच्या सुमारास तीन-चार हल्लेखोरांनी टिंबर डेपो मार्गावर खून केला. ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या हत्येचे संतप्त पडसाद उमटले व दोन समुदायात संघर्ष सुरू झाला. गुजरीबाजार, श्‍याम टॉकीज, गटरमलपुरा आदी भागांत दगडफेक झाली. जमावाच्या रोषाने मोहंमद अतिक मो. रफिक- चिकनवाला व कपडा व्यापारी सैफ अली मोहमद कमाल (वय 24) हे दोघे गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
श्‍यामा पहेलवान यांची हत्या झाल्यानंतर जवळपास दोनशे ते तीनशेच्या आसपास जमाव ठाण्यावर जमला होता. मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी या जमावाने केली. संतप्त जमावाने रस्त्यावर 20 ते 25 दुचाकींची तोडफोड केली तर काही भागांतील दुकाने बंद केली व काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दंगा नियंत्रण पथकासह राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. परतवाडा पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
श्‍यामा पहेलवान यांच्यावर कुणी हल्ला केला, त्यानंतर जमावापैकी कुणी दोघांवर हल्ला करून त्यांचा खून केला. यासंदर्भात कोणतीही माहिती पुढे आली नाही. मारहाणीच्या घटनेत पाचजण गंभीर जखमी झाले. त्यापैकी मोहंमद कमालउद्दीन मो. जिलानी यांना उपचारासाठी अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुख्य बाजारपेठ बंद
निवडणूक आचारसंहिता व नवरात्रोत्सव लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी प्रतिष्ठाने व मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली. गटरमलपुरा भागातील एका युवकाची दुपारी हत्या झाल्याची अफवा पसरल्याने तणाव वाढला. उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले.
तिघे ताब्यात
श्‍यामा नंदवंशी हे टिंबर डेपोमध्ये गेले असता तेथे त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. त्यामुळे आरोपींनी चाकू, कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी शिवम नंदवंशी यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात साजिद येला, जावेद वईद, शाहरुख, परवेजपरू, अण्णा, फरर्शिद खॉं रहमत खॉं या सहाजणांवर संशय व्यक्त केला. यातील फरर्शिद खॉं रहमत खॉं याच्यासह आणखी दोन, असे एकूण तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stress in the paratwada : Two killed in stone pelting