उच्चशिक्षित तरुणांच्या जिद्दीला सलाम...लॉकडाउनच्या काळात गावच्या मुलांच्या शिक्षणाचा उचलला विडा

मोहाडी : सोरना येथे स्वयंशिस्तीने शिक्षण घेताना विद्यार्थी.
मोहाडी : सोरना येथे स्वयंशिस्तीने शिक्षण घेताना विद्यार्थी.

मोहाडी (जि. भंडारा) : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे म्हटले जाते ते उगीच नाही. शिकेल तो टिकेल हेही ब्रीद शिक्षणाच्या बाबतीत लागू पडते. कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्व व्यवहारांसह शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम पडला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना शाळेतही पाठवत नाहीत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनला.

अशा परिस्थितीत सोरना गावातील उच्चशिक्षित, होतकरू तरुणांनी गटपद्धतीने मुलांना शिकविण्याचा विडा उचलला आहे. हे सर्व तरुण-तरुणी विनामानधन तत्त्वावर स्वयंसेवक म्हणून ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्‍यात कौतुक केले जात आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील सगळे कामकाज ठप्प झाले आहे. देशाच्या आर्थिक नुकसानासोबत शिक्षण व्यवस्थाही कोलमडून पडली आहे. शाळा-महाविद्यालये विद्यार्थ्यांशिवाय ओस पडून लागली आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविधस्तरातून प्रयत्न होत आहेत.
लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विविध समाजसेवी संस्था, गावातील सुशिक्षित तरुणांचे सहकार्य मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्‍यातील दुर्गम भागातील सोरना या गावात दिसून येत आहे.

मध्यप्रदेशच्या सीमेवरील गाव

सोरना हे गाव जंगलव्याप्त असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावातील सर्व मुले याच शाळेत शिकतात. एक वर्षापूर्वी ते सर्व नवीन सुरू झालेल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकायला जात होते. मात्र, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारल्याने 19 विद्यार्थ्यांनी परत प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आहे. सध्या एक ते चार वर्गात 14 मुले व 18 मुली शिकत आहेत.

इतर गावांच्या शाळांसाठी आदर्श

शाळेचे मुख्याध्यापाक चेतनानंद मेश्राम, सहायक शिक्षक कैलाश चव्हाण हे व्हॉटसऍप ग्रुपवर विद्यार्थ्यांना दैनिक गृहपाठ नियमित देत असतात. गृहपाठ व इतर अध्यापनाचे कार्य गावातील उच्चशिक्षित स्वयंसेवक उत्साहाने करीत आहेत. या कार्यात त्यांना पालकांसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी असलेले सरपंच सरिता प्रेमलाल राठोड, उपसरपंच धुपेंद पुरणलाल उचिबगले व सर्व पदाधिकारी सहकार्य करीत आहेत. कोरोना काळातील हा स्तुत्य उपक्रम इतर गावांच्या शाळांसाठी आदर्शच ठरत आहे.


मार्ग दाखवणारे दीपस्तंभच

लॉकडाउनच्या कालावधीत गावातील उच्चशिक्षित कोमल राठोड, धर्मपाल देवदास धुर्वे, विपिन उचिबगले, राकेश वाघाडे, देवानंद शहारे, प्रीती राठोड या तरुणांनी मुलांच्या ज्ञानार्जनाचा विडा उचलला आहे. त्यांचे दोन गटांत पाच-पाच विद्यार्थ्यांना सकाळी व सायंकाळी वर्ग घेणे सुरू केले आहे. एक गट व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आलेला गृहपाठ स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविते. दुसऱ्या दिवशी गृहपाठ तपासून त्यातील चुकांबाबत मार्गदर्शन करते. त्यामुळे सोरना येथे युवक लहान विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्ग दाखविणारे दीपस्तंभच झाले आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com