स्कूल व्हॅनसह विद्यार्थ्यांना आणले आरटीओ कार्यालयात

स्कूल व्हॅनसह विद्यार्थ्यांना आणले आरटीओ कार्यालयात
नागपूर : आरटीओ कार्यालय. अधिकाऱ्यांची आरडाओरड सुरू होती. एका स्कूल बसवर त्या अधिकाऱ्याने जप्तीची कारवाई केली. मात्र या स्कूलबसमध्ये आठ ते दहा चिमुकली मुले रडत होती. अधिकाऱ्यांच्या किंचाळण्यामुळे ही चिमुकले मुले पुरती घाबरली. मात्र या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. वाहन जमा करण्यासाठी त्यांनी तगादा लावला. विशेष असे की, स्कूलबस चालकाने गाडीची सर्व कागदपत्रे अधिकाऱ्याकडे दिली. माणुसकी हरवल्यागत आरटीओतील अधिकारी वागले. त्या चिमुकल्यांचे केविलवाणे चेहरे बघूनही त्यांना दया आली नाही. हा सारा प्रकार आरटीओ कार्यालयात दुपारच्या सुमारास घडला.
शाळा सुटल्यानंतर चिमुकल्यांना घरचे वेध लागतात. घरी पालकही आपल्या मुलांच्या प्रतीक्षेत असतात. परंतु रस्त्यात आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर या स्कूल बसवर जप्तीचे आदेश असून विद्यार्थ्यांना घरी सोडल्यावरच हे वाहन निश्‍चित ठिकाणी जमा करण्याच्या सूचना आहेत, असे सांगण्यात आले. परंतु बुधवारी एका अधिकाऱ्याने स्कूल व्हॅनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसह आरटीओ कार्यालयात आणले. येथे बराच वेळ ही चिमुकली मुले ताटकळत होती. अचानक खाकी वर्दीतील या वाहतूक अधिकाऱ्याने आणले. यामुळे भीतीपोटी सर्व मुले रडत होती. मात्र या अधिकाऱ्याने याकडे साफ दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे चित्र दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तशी सूचना दिली, परंतु तरीही वारंवार "मेरे मुर्गी की एकही टांग' अशाप्रकारे ते अधिकारी वागत होते. अखेर अनेकांनी त्या अधिकाऱ्यावर दबाव आणला, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने स्वतः त्या स्कूल व्हॅनमध्ये बसले. मुलांना घरी पोहोचवले. त्यानंतर वाहन जप्त केले, अशी माहिती पुढे आली.
वाहनचालकाची विनवणी
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस आणि स्कूल व्हॅनच्या विरोधात सर्वत्र कारवाई करण्याच्या सूचना परिवहन कार्यालयाकडून दिल्या आहेत. त्यानुसार नागपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागातही कारवाई अभियान सुरू आहे. बुधवारी शहर आरटीओ कार्यालयातील अधिकारी वासुदेव मुगल या मोटार वाहन निरीक्षकाने भवन्स, सिव्हिल लाइन्स येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एमएच-31, डीएस-5197 क्रमांकाच्या स्कूल व्हॅनची दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास तपासणी केली. त्यात बऱ्याच नियमांना बगल दिल्याचे निदर्शनास आले. हे वाहन जप्त करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित पोहचवून देणे अपेक्षित होते. मात्र
मुगल यांनी स्कूल व्हॅनसह विद्यार्थ्यांनाही आरटीओ कार्यालयात आणले. घरी पोहचवण्यास उशीर होत असल्याने पालकांचे मोबाईल व्हॅनचालकाच्या मोबाईलवर खणखणत होते. तर वाहनातील लहान मुले रडू लागली. वाहनचालकाने वाहनाची कागदपत्रासह त्याचा परवाना मुगल यांच्याकडे दिला. मुलांना सोडून लगेच परत येतो, अशी विनवणी मुगल यांना केली. परंतु मुलांना दुसऱ्या वाहनातून सोडण्याचा हट्ट धरला. मुलांना उपाशी-तापाशी ताटकळत ठेवले. ही माहिती उपस्थितांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना दिली. आदे यांनी तातडीने मुगल यांना वाहनात बसून विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित सोडण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com