esakal | 'फादर्स डे'ला मुलाने वडिलांना दिली अनोखी भेट; असे पूर्ण केले स्वप्न 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्वप्नाला आपल्या मेहनतीची जोड देऊन आज वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत नायब तहसीलदार म्हणून अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. स्पर्धा परीक्षेची कुठलीही शिकवणी न लावता फक्त वाचनालयातून अभ्यास केला. अक्षयने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

'फादर्स डे'ला मुलाने वडिलांना दिली अनोखी भेट; असे पूर्ण केले स्वप्न 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा (अमरावती) : कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने आपल्या झोपडीतच अभ्यासाचा दिवा पेटवून आज राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या झोपडीसह समाजाला प्रकाशमान केले आहे. तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग या युवकाने गरिबीच्या परिस्थितीशी झगडून यशोशिखर गाठले. 

तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अत्यंत जिद्द व चिकाटीच्या जोरावर अधिकारी बनला आहे. अक्षय हा लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वक्‍तृत्व स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली होती. परंतु, वेगळे काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या अक्षयने अधिकारी होण्याचे ठरवले. परिस्थिती अत्यंत बेताची असताना अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग हे 40 वर्षांपासून भंगार व रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. गरिबीचे चटके बसू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

स्वप्नाला आपल्या मेहनतीची जोड देऊन आज वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत नायब तहसीलदार म्हणून अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. स्पर्धा परीक्षेची कुठलीही शिकवणी न लावता फक्त वाचनालयातून अभ्यास केला. अक्षयने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अक्षयने शाळेच्या वादविवाद स्पर्धा, वक्तृव स्पर्धा व इतर स्पर्धांत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिकसुद्धा पटकावले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने यादी पीएसआय वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. अभ्यास सतत चालू ठेवत त्याने आज राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्याच्या यशाचे कौतुक शहरात होताना दिसत असून, त्याच्या या कामगिरीमुळे आईवडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, नगराध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने व सागर भवते यांनी अक्षयचा सत्कार केला. 

अक्षय गडलिंग हा श्री देवराव दादा हायस्कूल येथील विद्यार्थी आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या अक्षयने 2010मध्ये दहावीत 84.60 टक्के गुण प्राप्त केले. बारावीत 68 टक्के गुण प्राप्त केले. तर बीई मेकॅनिकल इंजिनिअर शिवाजी शिक्षण अकोला महाविद्यालयात पूर्ण केले. यातूनच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करत नायब तहसीलदार पदावर आपल्या यशाची मोहर पक्की केली आहे. 

हेही वाचा :...अन्‌ तुकाराम मुंढे तावातावात सभागृहातून निघून गेले; इतिहासातील पहिलीच घटना

अक्षयला या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात विशेष मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. सेठिया मॅडम व त्याचे मित्र आहेत. तिवसा पोलिस ठाण्यातील तेव्हाचे पीएसआय व सध्या यवतमाळ येथे एपीआय म्हणून कार्यरत असलेले आशीष बोरकर यांनी त्याला विशेष मार्गदर्शन व चांगल्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची मदत केली. त्याचबरोबर इतरही आर्थिक मदत बोरकर यांनी केली. तिवसा येथे कार्यरत असताना बोरकर यांनी ठाण्याच्या मैदानात शिकवण्याचे वर्ग घेऊन अनेक मुलांना विशेष मार्गदर्शनसुद्धा केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच अनेक विद्यार्थी घडले. बार्टी संस्थेमार्फत अक्षयने दिल्लीला यूपीएससी शिकवणीचे वर्ग करून अभ्यास पूर्ण केला व तेथूनच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बारा तास करत यशाचे शिखर गाठले. 

आमच्या कष्टाचे फलित खऱ्या अर्थाने आज झाले असे मला वाटत आहे. अक्षय अभ्यासात तसा हुशार आहे. बारा तासांच्या वर वाचन करून त्यांनी स्वतःच्या मेहनतीने यश खेचून आणले आहे, याचा मला वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभार मानतो. याहीपेक्षा मोठ्या पदावर अक्षय जाईल, असा मला विश्वास आहे. 
-बाबाराव गडलिंग, अक्षयचे वडील