नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातच अचानक उत्खनन, वृक्षतोड...वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प वाघ व इतर अन्य वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा नैसर्गिक अधिवास आहे. या कोअर झोनमधून लेंडी, तेंदू, सिंहना, सूर्या, जुडपी व कुडवा या प्रजातींची झाडे तोडण्यात आली.

साकोली (जि. भंडारा) : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये अवैधरीत्या मुरूम उत्खनन व वृक्षतोडीची कामे सुरू आहेत. या प्रकारामुळे वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला हानी पोहोचण्याची शक्‍यता आहे.

 

व्याघ्र संरक्षण आणि वनसंवर्धन कायद्याचे उल्लंघन होत असताना संबंधित विभाग मात्र गप्प असल्याचा आरोप पीपल फॉर ऍनिमल्स या संघटनेचे जिल्हा सचिव सचिन रंगारी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

 

महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प वाघ व इतर अन्य वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा नैसर्गिक अधिवास आहे. व्याघ्रप्रकल्पात कोअर झोनमध्ये वृक्षतोड करण्यास तसेच कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास मनाई आहे. अशी नियमबाह्य कृती करणाऱ्या व्यक्तींवर वनकायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे.

विविध प्रजातींच्या वृक्षांना धोका

तरीसुद्धा प्रतिबंधित क्षेत्रात जेसीबी मशीनद्वारे कंपार्टमेंट क्रमांक 96, 97, 98 तसेच 109, 110, 120, 121, 125, 126 मधील झाडे कापण्यात आली आहेत. हे सर्व कंपार्टमेंट क्षेत्र नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील कोअर झोनचा भाग आहे. या कोअर झोनमधून लेंडी, तेंदू, सिंहना, सूर्या, जुडपी व कुडवा या प्रजातींची झाडे तोडण्यात आली.

कोअर झोनमध्ये पोहोचला जेसीबी

या व्याघ्र प्रकल्पात जेसीबी (क्र. एमएच 35 जी 5921) गेल्या 21 मार्च रोजी व्याघ्रप्रकल्पातील पोंझारा गेटमधून आत नेण्यात आला. त्याच गेटमधून 23 एप्रिल रोजी बाहेर पडला. याच जेसीबीने मंगेझरी गेटमार्गे कोअर झोनमध्ये 20 मे रोजी प्रवेश केला असून तो आजही कोअर झोनच्या आतच आहे. संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्रात जेसीबीचा वावर सुरू असताना अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून चौकशी व कारवाई करण्याची मागणी रंगारी यांनी केली आहे.

असं घडलंच कसं? : ह्रदयद्रावक घटना! मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलाचाही तडफडून मृत्यू

चौकशीनंतरच कारवाई होणार
प्रथमदर्शनी पाहणी केली असता झाडे कापल्याचे आढळले नाही. छायाचित्रातील कापलेली झाडे कुठली आणि केव्हाची आहेत, याबाबत माहिती नाही. कोणत्या कंपार्टमेंटमधील झाडे कापली गेली, याची प्रत्यक्ष पाहणी करावी लागेल. याबाबत चौकशी सुरू असून अधिक काही सांगता येणार नाही.
- पूनम पाटे, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प, साकोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden excavation, deforestation in the protected area of Navegaon-Nagzira tiger project