नागपूरची सुमेधा बालपांडे "स्वरवैदर्भी'ची महाविजेती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित "स्वरवैदर्भी लिटल चॅम्प्स' विदर्भस्तरीय सिनेगीतगायन स्पर्धेचे विजेतेपद नागपूरच्या सुमेधा बालपांडे या सात वर्षीय बालगायिकेने पटकावले. सोळा वर्षांखालील बालकुमार गायकांसाठी आयोजित या स्पर्धेची उपविजेती मिताली कोहाड ठरली. तर तृतीय पुरस्काराचा सन्मान ज्ञानदा खोडे आणि सानिका बोभाटे यांना प्राप्त झाला.

वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित "स्वरवैदर्भी लिटल चॅम्प्स' विदर्भस्तरीय सिनेगीतगायन स्पर्धेचे विजेतेपद नागपूरच्या सुमेधा बालपांडे या सात वर्षीय बालगायिकेने पटकावले. सोळा वर्षांखालील बालकुमार गायकांसाठी आयोजित या स्पर्धेची उपविजेती मिताली कोहाड ठरली. तर तृतीय पुरस्काराचा सन्मान ज्ञानदा खोडे आणि सानिका बोभाटे यांना प्राप्त झाला.
सावंगीच्या विद्यापीठ सभागृहात आयोजित या महाअंतिम स्पर्धेचे उद्‌घाटन कुलपती दत्ता मेघे यांनी केले. यावेळी संस्थेच्या विश्‍वस्त शालिनीताई मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, डॉ. शैलेश अग्रवाल, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, अबकारी अधिकारी प्रशांत वानखेडे, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेकरिता प्राप्त झालेली प्रवेशशुल्काची संपूर्ण रक्कम 25 हजार सहाशे रुपये राज्यातील पूरग्रस्तांकरिता मुख्यमंत्री निधीला देत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या महाअंतिम स्पर्धेत बालकुमार गायकांनी लोकप्रिय सिनेगीत आणि मराठी लोकगीतांसह महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त "बापू का पैगाम' या फेरीत गांधीगीत व देशभक्तिपर गाणी सादर केली. यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सुमेधा बालपांडे हिला प्रथम पुरस्कार 22 हजार रुपये आणि कुलपती दत्ता मेघे यांनी जाहीर केलेले 11 हजार रुपये, असा एकूण 33 हजार रुपयांचा रोख पुरस्कार प्राप्त झाला. मिताली कोहाड (नागपूर) हिला 11 हजार रुपयांचा व्दितीय पुरस्कार प्राप्त झाला, तर तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या ज्ञानदा खोंडे (नागपूर) आणि सानिका बोभाटे (वर्धा) या दोघींनाही पुरस्कार विभागून न देता प्रत्येकी सात हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, अनुराग पवार (बुलडाणा), आयुष मानकर (नागपूर), गीत बागडे, भाग्यश्री खानोडे (यवतमाळ), सिबतैन हुसैन शेख (मारेगाव), मुक्ता झाडे (वर्धा) व तालश्री दानव (हिंगणघाट) या बालगायकांना प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 72 हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात आले. सर्व स्पर्धकांना शालिनीताई मेघे, डॉ. राजीव बोरले, संजय इंगळे तिगावकर, परीक्षकगण गझलगायक व संगीतकार डॉ. राजेश उमाळे (अमरावती), अनंत धूम्रकेत (चंद्रपूर), अश्‍विनी ठोंबरे (कॅलिफोर्निया, अमेरिका), दीपक मेने, श्‍याम सरोदे, भारती भांडे कदम यांच्या हस्ते स्वरवैदर्भी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या समारोहाचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले. सुनील रहाटे यांनी आभार मानले. स्पर्धेत सहभागी सर्व गायकांना चारू साळवे, शैलेश जगताप, दिनेश गवई, राजेंद्र झाडे, प्रदीप म्हैसकर, रवी ढोबळे यांनी संगीतसाथ केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumedha Balpande of Nagpur won the title of "Swarvayadvarbhi"