नवीन वर्षातील पहिला सुपरमून आज दिसणार; वाचा काय राहणार विशेष!

supermoon image.jpg
supermoon image.jpg

अकोला : नवीन वर्षांत अनेक खगोलीय घटना पाहण्याची संधी खगोल अभ्यासकांना मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील दुसरा रविवार (ता.9) खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. रविवारी वर्षातील पहिले सुपरमून खगोल अभ्यासकांसह सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे. या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा मोठा व अधिक प्रकाशमान दिसणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

या वर्षात एकूण चार सुपरमूनची अनुभूती खगाेल अभ्यासकांसह सर्वसामान्यांना घेता येणार आहे. त्यापैकी पहिला सुपरमून रविवारी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. या सुपरमूनला फुल स्नो मून, फुल हंगर मून असेही म्हणतात. पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतर नेहमी सरासरी 3 लाख 85 हजार किमी. असते, परंतु या दिवशी हे अंतर थोडे कमी होईल. त्यामुळे चंद्रबिंब हे नेहमीपेक्षा मोठे व प्रकाशमान दिसेल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ या सारख्या घटना घडू शकतात. 

खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा
चंद्र हा पृथ्वीपासून दर वर्षाला 3.8 सेंमी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व 100 वर्षांनी दिवस हा 2 मिली सेकंदाने मोठा होईल. चंद्रावर 30 हजार विवरे व 12 पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. रविवारी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य तथा हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

वर्षांतून चारदा दिसेल सुपरमून
पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून असे म्हणतात. या वर्षी एकूण चार सुपरमूनचा अनुभव खगोल अभ्यासकांसह सर्वसामान्यांना घेता येणार आहे. 9 फेब्रुवारीनंतर वर्षातील दुसरा सुपरमून 9 मार्च, त्यानंतर 8 एप्रिल व 7 मे रोजी त्याची अनुभूती घेता येणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

सर्वांत कमी अंतर असणार सुपरमून 2052 मध्ये
या पुर्वी सर्वात कमी अंतर असलेला सुपर मून 26 जानेवारी 1948 मध्ये दिसला होता. विसाव्या शतकातील सर्वात कमी अंतर असलेला सुपरमून 25 नोव्हेंबर 2034 मध्ये, तर 1948 प्रमाणे सर्वात कमी अंतरावर असलेला सुपरमून डिसेंबर 2052 मध्ये दिसणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com