अभिनंदनीय! लोकसहभागातून कुपोषित बालकांना माणुसकीची ऊब!

balanced-diet-dish
balanced-diet-dish

चंद्रपूर : सुदृढ समाज निर्मितीसाठी कुपोषणमुक्त बालकांची गरज आहे. पोषण आहाराचा अभाव, घरातील अठराविश्‍व दारिद्य्र, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, कुमारी मातांच्या प्रश्‍नांकडे होणारे दुर्लक्ष यातून कुपोषणाची समस्या पुढे येते. कोरपना तालुका कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेऊन जाणीव माणुसकीची अभियानाचा प्रारंभ नांदा येथे तालुका बालविकास अधिकारी गणेश जाधव, शरदचंद्र पारखी, समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कोरपना तालुक्‍यात एकूण तीव्र व मध्यम अशी ६० मुले कुपोषित आहेत. त्यांना योग्य जीवनसत्त्व देणारा आहार दैनंदिन मिळाला, तर नक्कीच काही महिन्यांत बालकांना कुपोषणातून साधारण श्रेणीत आणू शकतो. मध्यम व तीव्र कुपोषित बालकांना तीन महिने आहार पुरवठा पाथ फाउंडेशन व डॉ. गिरिधरभाऊ काळे सामजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होणार आहे.

कोरपना तालुका कुपोषणमुक्त व्हावा, कोवळी पानगळ थांबावी, यासाठी लोकसहभागातून तालुक्‍यात जाणीव माणुसकीची हे अभियान राबविण्यात येत आहे. या विधायक उपक्रमांतर्गत कोरपना तालुक्‍यातील ४६ मध्यम व १४ तीव्र अशा एकूण ६० कुपोषित बालकांना पोषण आहार किट तसेच मोफत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. समाजसेवक डॉ. गिरधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व पाथ फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.

या पोषण आहार किटमध्ये हरभरा, मुग, वटाणे, बरबटी, गूळ, शेंगदाणे, अंडे व मोट देण्यात येत आहे. या अभियानाचे वेगळेपण म्हणजे, प्रत्येक ग्रामस्तरावर सामाजिक क्षेत्रात आवड असणारा ग्रामसाथी मुलांकडे विशेष लक्ष देत आहे. तालुक्‍यातील ३५ गावात ६० कुपोषित बालकांना पोषण आहार किट व मोफत आरोग्य कार्ड देण्यात येत असून, बाळाचे वजन, उंची, दंडघेर आदी माहिती घेतली जात आहे. तीन महिन्यांचा आहार दिल्यानंतर बालकांत झालेला बदल समजून घेण्यासाठी पुन्हा वजन, उंची, दंडघेर ही माहिती प्रत्यक्ष जाऊन बघितली जाईल. गडचांदूर येथील चटप क्‍लिनिकचे डॉ. जयदीप चटप शून्य ते सहा वयोगटातील सर्व मुलांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार देणार आहेत. कुपोषणमुक्तीसाठीचे हे अभियान लोकसहभागातून असून समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी मुलांना आहार पुरवठा करण्याकरिता सहकार्य केल्याची माहिती अभियानाचे मुख्य सूत्रधार ऍड. दीपक चटप व अविनाश पोईनकर यांनी दिली.

नांदा येथे जाणीव माणुसकीची अभियान प्रारंभप्रसंगी बालविकास अधिकारी गणेश जाधव यांनी, कुपोषित बालकांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून सामाजिक दायित्व जोपासत कोरपना तालुक्‍यात सुरू झालेले हे अभियान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शरदचंद्र पारखी यांनी, पालकांनी कुपोषित बालकाकडे दुर्लक्ष करू नये. जाणीव माणुसकीची अभियानाला शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य असेल. कोरपना तालुक्‍यात पुढील ३ महिने चालणाऱ्या या अभियानातून नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील, असे सांगितले. यावेळी डॉ. गिरिधर काळे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, संतोष उपरे, हबीब शेख उपस्थित होते.

रचनात्मक कार्य उभे राहील
लोकसहभागातून होत असलेल्या या विधायक कामातून कोरपना तालुक्‍यात कुपोषण या विषयावर रचनात्मक कार्य उभे राहील असे वाटते. प्रत्यक्ष कुपोषित बालकांना भेटत असताना समाजातील सर्वच स्तरात व्यापक जनजागृती निर्माण झाल्याशिवाय तालुका कुपोषणमुक्त होणे शक्‍य नाही.
दीपक चटप,
संयोजक, जाणीव माणुसकीची अभियान
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com