सेनेत भरती होण्यासाठी बोगस कागदपत्रांचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कामठी  (जि.नागपूर) :  गार्डस रेजिमेंट सेंटर कॅन्टोनमेंट कामठी येथे आग्रा येथील एक युवक बोगस कागदपत्रांच्या आधारे सेनेत भरती झाला. परंतु, सहा महिन्यांनंतर युवकाने बोगस कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले; तेव्हा प्रकरण उजेडात येताच युवक कामठी प्रशिक्षण केंद्रातून पळून गेला. त्याच्याविरुद्ध कामठीच्या जुना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मनोज सलोतरी हा युवक सेनेत भरती झाला. त्याला प्रशिक्षणासाठी कामठीच्या गार्डस रेजिमेंट सेंटर येथे पाठविण्यात आले. 13 मार्चला प्रशिक्षण घेण्यासाठी तो कामठीत हजर झाला. तेथे अधिकाऱ्यांनी त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्याच्याकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर मनोज दिनेश सलोतरी असे नाव आढळले. त्यावेळी प्राथमिक स्तरावरावरील पडताळणीनंतर त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यानंतर 4 सप्टेंबरला आग्रा येथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली असता मनोज दिनेश सलोतरी (वय 21, भद्रोली, तालुका बाह, जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश) या नावाने सेनेत भरती होण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे दुसऱ्या व्यक्‍तीची असल्याचे निष्पन्न झाले. मनोज सलोतरी नावाची व्यक्ती गावात राहात असून त्याने सेनेत भरती होण्याकरिता कधीच प्रयत्न केले नसल्याचे मनोज सलोतरी या इसमाने सांगितले. परंतु, त्याचे कागदपत्र हरविले असून कुणीतरी त्या कागदपत्रांचा गैरवापर करीत असल्याचे त्याने सांगितले. सेनेत भरती झालेल्या युवकाला 30 सप्टेंबरला चौकशीची भणक लागताच तो प्रशिक्षण केंद्रावरून लगेच गायब झाला. यासंदर्भात सूरजभान मानसिंग (वय 42) यांच्या तक्रारीवरून कामठी जुना पोलिस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support for Bogus Documents to Enlist in the Army