श्‍वास रोखून सुरेशने काढले पुरात विहिरीत बुडालेले मोटारपंप, शेतकरी मित्र म्हणून ओळख

राहुल मैंद
Sunday, 18 October 2020

तालुक्‍यातील पिंपळगाव (भोसले) येथील सुरेश उपरीकर यातील एकच. पुरात विहिरीत बुडालेल्या मोटार पंप पाण्यात उतरून आणि श्‍वास रोखून काढण्याचे कौशल्य सुरेशने आत्मसात केले आहे. तो सध्या परिसरात शेतकरी मित्र म्हणून ओळखला जात आहे.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : "एक तरी अंगी असू दे कला नाही, तर काय फुका जन्माला" या भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छंद आणि कलेचे महत्त्व विशद केले आहे. आपल्याजवळ असलेल्या कलेचा कधी, कुठे उपयोग होईल, हे सांगता येत नाही. कला, कौशल्यामुळे समाजात वेगळी ओळख निर्माण होते.

तालुक्‍यातील पिंपळगाव (भोसले) येथील सुरेश उपरीकर यातील एकच. पुरात विहिरीत बुडालेल्या मोटार पंप पाण्यात उतरून आणि श्‍वास रोखून काढण्याचे कौशल्य सुरेशने आत्मसात केले आहे. तो सध्या परिसरात शेतकरी मित्र म्हणून ओळखला जात आहे.

सुरेश गोमाजी उपरीकर पिंपळगाव (भोसले) येथील रहिवासी आहेत. या गावाला वैनगंगा नदीच्या पुराचा नेहमीच फटका बसतो. दरवर्षी शेकडो हेक्‍टर शेती पुरात बुडते. सिंचनासाठी या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात विहिरी खोदल्या आहेत. मात्र पुराचे पाणी शेतात आले की विहीरसुद्धा बुडते.

विहिरीतील मोटारपंप पाण्याखाली जातात. पूर ओसरल्यानंतरही विहिरीत भरपूर पाणी असते. मोटारपंपाची दुरुस्ती केल्याशिवाय ते वापरणे शक्‍य नसते. हेच मोटारपंप पाण्यातून काढण्यासाठी सुरेश शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातो.

पोहण्यात तरबेज

सुरेशला लहानपणापासूनच पोहण्यात तरबेज आहे. पाण्यात बुडून बराच वेळ श्‍वास रोखून ठेवण्याचे कौशल्यही त्याने मिळविले आहे. पण या कलेचा कधी उपयोग झाला नव्हता. परंतु 1994 मध्ये वैनगंगेला मोठा पूर आला होता. त्यावेळी पिंपळगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटरपंप बुडाल्या. त्यावेळी सुरेश शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेला.

जाणून घ्या : नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा 'आविष्कार' आणि सन्मानाचा 'जागर'; एकीकडे भक्ती तर दुसरीकडे मात्र...

सत्तरावर शेतकऱ्यांना सुरेशची मदत

विहिरीतील खोल पाण्यातील बुडालेल्या मोटारपंप सुरेशने आपल्या कौशल्याचा वापर करून काढल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकरी त्याला आर्थिक मदतीही करतात. मागील २४ वर्षांपासून सुरेश हे काम करीत आहे. यावर्षी आलेल्या पुरात सत्तरावर शेतकऱ्यांच्या सुरेशने मदत केली. त्याला पुराच्या संकटातील ‘शेतकरी मित्र’ म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh out a motor pump submerged in a flooded well