esakal | हिंदवी स्वराज्याचा वारसा सांगणारी 'स्वराज्य ध्वज' मोहिम नंदूरबारात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदवी स्वराज्याचा वारसा 'स्वराज्य ध्वज' मोहिम नंदूरबारात दाखल

हिंदवी स्वराज्याचा वारसा 'स्वराज्य ध्वज' मोहिम नंदूरबारात दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार: शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेचा वारसा सांगणारी स्वराज्य ध्वज मोहिम आज नंदूरबार येथे पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांची संकल्पना असणाऱ्या स्वराज्य ध्वज पूजन मोहिमेचा आजचा चौथा दिवस आहे. चंदनपुरी येथील खंडोबाराया व बानाईच्या मंदिरातून आजची सुरूवात झाली.

यावेळी दैवत दर्शनानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. तेथून ही मोहीम नंदुरबार येथे आली. तिचे स्वागत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी केले. तेथून याहामोगी देवीचा दरबारात ध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले.

नंदूरबारच्या सीमेलगत गुजरातच्या बाजूने सातपुडा पर्वतराजीत अत्यंत निसर्गरम्य परिसरात श्री याहमोगी माता विसावलेली आहे. इथल्या सुलबारी टेकडीवर आदिवासी समाजाचे अत्यंत जागृत व आराध्य देवस्थान असलेल्या याहमोगी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात देवीचे दर्शन व आशिर्वाद घेतल्यानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, भीमसिंग पाडवी-जिल्हाउपाध्यक्ष, जितेंद्र कोकणी, प्रमोद कुमार वसावे, बाळासाहेब मोरे, प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वराज्य ध्वज प्रवासाचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरातून ९ सप्टेंबर रोजी झाला. आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले होते. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून हि ध्वज मोहिम एकूण ३७ दिवस चालणार आहे. जगातील सर्वात उंच ध्वज फडकवण्याचा संकल्प पवार यांनी केला आहे.

असा असेल ध्वज

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६ बाय ६४ फूट असून वजन ९० किलो आहे. तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे.

३७ दिवस मोहीमेचा प्रवास

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम, राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

loading image
go to top