तडीपारांनी पेट्रोल टाकून तीन घरे पेटविली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

अमरावती :  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जिल्ह्याबाहेर तडीपार केल्यानंतरही शहरात आलेल्या तिघांनी आमलेवाडी परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. युवकावर चाकूने हल्ला करून लुटमार केल्यानंतर पेट्रोल टाकून तिघांची घरे पेटविली. निवडणूक काळात ही खळबळजनक घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

अमरावती :  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जिल्ह्याबाहेर तडीपार केल्यानंतरही शहरात आलेल्या तिघांनी आमलेवाडी परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. युवकावर चाकूने हल्ला करून लुटमार केल्यानंतर पेट्रोल टाकून तिघांची घरे पेटविली. निवडणूक काळात ही खळबळजनक घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी (ता. आठ) विजयादशमीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. एकजण अद्याप पसार आहे. निशांत दिलीप इंगळे व शिवा शेषराव सरदार (दोघेही रा. महाजनपुरा) अशी अटकझालेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार मयूर भगत फरार आहे. या तिघांवरही अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आमलेवाडी येथील रहिवासी नीलेश रामदास हिरूळकर हे दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी परिसरात उभे होते. या वेळी तिघेही त्यांच्याजवळ आले व त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने निशांत, शिवा व मयूरने हिरूळकर यांच्या घरी जाऊन साहित्य फेकले. चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर तिन्ही तडीपारांनी त्यांच्या घरातील 70 हजारांची रोकड लुटली. तिघेही एवढ्यावरच थांबले नाही तर पेट्रोल ओतून हिरूळकर यांच्यासह शेजारी राहणाऱ्या भावाच्या घरालाही आग लावली. खोलापुरी गेट पोलिसांचा ताफा आमलेवाडीत दाखल झाला. नीलेश हिरूळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही तडीपारांविरुद्ध प्राणघातक हल्ला, जाळपोळ, लुटमारप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे पथकही आरोपींच्या मागावर होते. बुधवारी (ता. नऊ) सकाळी पथकाने निशांत इंगळे व शिवा सरदारला कांडलकर प्लॉट परिसरातून अटक केली. मयूर भगत अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tadipars burnt petrol and burned three houses