आता गावकरी करणार वाघांशी दोन हात, ताडोबा व्यवस्थापनाने केली ही तयारी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

गावात किंवा गावालगत निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची. घटनास्थळी जमणारी गर्दी दूर कशी करायची. परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे, या साऱ्या गोष्टी प्रशिक्षणात शिकविल्या जात आहेत. हे प्रशिक्षण ताडोबाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील लोकांनाच दिले जात आहे. इको-प्रो नावाची संघटना यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. या संघटनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक बंडू धोतरे यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोहर्ली (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता वाढली आहे. या संघर्षामुळे उद्‌भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने आता पाऊल उचलले आहे. "प्रायमरी रिस्पॉन्स टीमची' स्थापना त्यासाठी करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यासाठी काही नवा नाही. विपुल प्राणीसंख्या बघता वनक्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे जंगली श्‍वापद गावात येतात. दुसरीकडे वनोपज मिळविण्यासाठी लोक वनात जाऊ लागले आहे. यातून हा संघर्ष निर्माण झालाय. या संघर्षात कधी मानव तर कधी प्राणी मारले जातात. अशावेळी परिस्थिती हाताळणे कठीण होते. त्यातल्यात्यात मनुष्यहानी झाल्यास लोकसंताप वाढतो. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने "प्रायमरी रिस्पॉन्स टीम" स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यातील सदस्यांना सध्या आगरझरी निसर्ग केंद्रात प्रशिक्षण दिले जात आहे. 

मानव-वन्यजीव संघर्ष आता 'पीआरटी' हाताळणार
गावात किंवा गावालगत निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची. घटनास्थळी जमणारी गर्दी दूर कशी करायची. परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे, या साऱ्या गोष्टी प्रशिक्षणात शिकविल्या जात आहेत. हे प्रशिक्षण ताडोबाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील लोकांनाच दिले जात आहे. इको-प्रो नावाची संघटना यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. या संघटनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक बंडू धोतरे यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गावकऱ्यांना प्रशिक्षण ; ताडोबा व्यवस्थापनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग
ताडोबाच्या बफर क्षेत्रात एकूण 92 गावे आहेत. यात 32 गावे अतिसंवेदनशील आहेत. या 32 गावांतील प्रत्येकी पाच लोकांची निवड करून त्यांना प्रायमरी रिस्पॉन्स टीममध्ये सहभागी केले गेले. घटना घडल्याबरोबर टीम घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात ठेवून वनविभागाला तातडीने माहिती देईल. वनाधिकारी येईपर्यंत ही टीम प्रकरण हाताळले. हा नवीन प्रयोग असून, राज्यात पहिल्यांदाच तो लागू होत आहे. उन्हाळ्यात वन्यजीव प्राणी आणि शिकारीच्या शोधात नागरी वस्तीत येतात. ग्रामस्थ वनोपजासाठी जंगलात येतात. याकाळात मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता अधिक असते. त्यामुळे प्रायमरी रिस्पॉन्स टीम कशा पद्धतीने काम करते, हे बघणे औत्सुक्‍याचे राहणार आहे. 

 

प्रायमरी रिस्पॉन्स टीममुळे अतिसंवेदनशील गावात वनविभागाला मोठी मदत होईल. कोणतीही घटना घडल्यास ही टीम सर्वप्रथम पुढे येईल आणि परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करेल. तसे प्रशिक्षण आणि साहित्य त्यांना दिले जाणार आहे.
- एन. आर. प्रवीण
क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tadoba administration made primary responce team