काय सांगता! तलाठ्याने केली सरकारची साडेतीन लाखांनी फसवणूक; आदिवासींच्या जमीन लाटल्या

चेतन देशमुख
Sunday, 13 December 2020

अनेक खोट्या सातबारावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे प्रकारही उघडकीस आले. यामध्ये त्याने शासनाची तीन लाख ४१ हजार ३६० रुपयांनी फसवणूक केली. आदिवासींची शेती गैरआदिवासींना खरेदी करता येत नसताना अनेक आदिवासींचे शेतं गैरआदिवासींच्या नावे केल्याचाही प्रकार घडला आहे.

मारेगाव (जि. यवतमाळ) : झरी तालुक्‍यातील सुर्ला साजातील तलाठ्याने दीडशे हेक्‍टर शेतजमिनीचे मालकी हक्कात फेरबदल करून अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासींची जमीन गैर आदिवासींच्या नावे केली. शासनाने शेतकऱ्यांना मदतीपोटी पाठविलेल्या तीन लाख ४१ हजार ३६० रुपये रकमेचे चुकीचे वाटप केल्याचेही उघड झाले आहे.

विजय निखार या तलाठ्याला निलंबित करून मारेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ११) तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सुर्ला येथे विजय गजानन निखार हा तलाठी म्हणून कार्यरत असताना या साजाअंतर्गत येणाऱ्या गावातील १४८.३६ हेक्‍टर शेत जमिनिच्या सात बारामध्ये खोडतोड करून अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र कमी करून दुसऱ्याचे क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार केला.

क्लिक करा - मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही; पहाटे उघडकीस आला थरार

अनेक खोट्या सातबारावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे प्रकारही उघडकीस आले. यामध्ये त्याने शासनाची तीन लाख ४१ हजार ३६० रुपयांनी फसवणूक केली. आदिवासींची शेती गैरआदिवासींना खरेदी करता येत नसताना अनेक आदिवासींचे शेतं गैरआदिवासींच्या नावे केल्याचाही प्रकार घडला आहे. शेत जमिनीचे रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, खाडाखोड करणे आदी प्रकारही या तलाठ्याने केले.

याप्रकरणी तलाठी विजय निखार याला निलंबित केले आहे. मंडळ अधिकारी चंद्रकांत परशराम भोयर यांनी मारेगाव पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून विजय निखार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल चौधरी, किशोर आडे करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi defrauding the government of Rs three lakh fifty thousand