गडचिरोलीत महिला तलाठ्याचा प्रताप...कमीशन घेतल्याने झाले निलंबन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

साजा जारावंडी येथील महिला तलाठी वलके या स्वतः शेतकरी, वृद्ध व विधवा महिलांच्या बॅंक खात्याचा विड्राल भरून त्यांच्यासोबत बॅंकेत जाऊन रक्कम प्राप्त करून घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी वलके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्‍यातील तलाठी साजा जारावंडी येथील महिला तलाठी किरण वलके या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुष्काळ निधीच्या रकमेतून कमीशन मागत होत्या. श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यास विधवा महिला व वृद्ध नागरिकांना दहा हजार रुपयांची मागणी करीत असल्याची नागरिकांची तक्रार होती.

ही तक्रार सरखेडा गावातील 30 शेतकरी व नागरिकांनी केल्यामुळे उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांनी किरण वलके यांच्यावर 30 मार्च रोजी निलंबनाची कार्यवाही केली आहे.

अतिवृष्टीने धानपिकांचे नुकसान

चालू शेती हंगामात अतिवृष्टी झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देण्यात आला. या दुष्काळ निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली गेली आहे.

योजनेचा लाभ मिळणार नाही

जारावंडी तलाठी साजा आदिवासीबहुल, अतिदुर्गम छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. या साजातील सरखेडा गावातील शेतकऱ्यांना तलाठी वलके यांनी जारावंडी येथे बोलावून घेतले. तुमच्या बॅंक खात्यात जमा दुष्काळ निधीतील 40 टक्‍के रक्कम मला काढून द्या; अन्यथा तुम्हाला यापुढे कोणत्याही योजनेचा फायदा मिळणार नाही, असी धमकी दिली.

हेही वाचा : सायंकाळी जंगलात गेलेल्या युवकासोबत घडली थरारक घटना

अखेर झाली निलंबनाची कारवाई

तलाठी वलके या स्वतः शेतकरी, वृद्ध व विधवा महिलांच्या बॅंक खात्याचा विड्राल भरून त्यांच्यासोबत बॅंकेत जाऊन रक्कम प्राप्त करून घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी वलके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi suspended for taking commission at gadchiroli