बंद पडलेल्या शाळेला शिक्षकांकडून जीवदान

नितीन नायगांवकर
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नागपूर - स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून सरकारी शाळांची काळजी करणारे बरेच आहेत. पण, एक बंद पडलेली सरकारी मराठी शाळा सुरू करण्यासाठी स्वतःच्याच मुलांचा पहिला प्रवेश करणारे शिक्षक दुर्मिळच आहेत. देवरी (जि. गोंदिया) येथे मात्र हे घडून आले आहे.

नागपूर - स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून सरकारी शाळांची काळजी करणारे बरेच आहेत. पण, एक बंद पडलेली सरकारी मराठी शाळा सुरू करण्यासाठी स्वतःच्याच मुलांचा पहिला प्रवेश करणारे शिक्षक दुर्मिळच आहेत. देवरी (जि. गोंदिया) येथे मात्र हे घडून आले आहे.

येथील बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, पोलिस, शिक्षण विभागातील लिपिक, कारकून, वसतीगृह अधीक्षक यांनी स्वतःच्या मुला-मुलींना या शाळेत घातले. खासगी शाळेत शिकविण्याची क्षमता असतानाही सरकारी शाळा जगविण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवरी येथे शहराच्या मधोमध जिल्हा परिषदेचे माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय होते. १९६४ मध्ये सुरू झालेल्या आणि एकेकाळी अडीच हजार पटसंख्या असलेल्या या शाळेला २००६ पासून घरघर लागली. खासगी शाळांचे वाढते प्रमाण, शासकीय उदासीनता, राजकीय इच्छाशक्ती, विषय शिक्षक नसणे आदी कारणांमुळे एकएक वर्ग बंद पडायला लागला. शेवटचा बारावीचा वर्गही २०१५ मध्ये बंद पडला आणि शाळा बंद झाली. शाळेची इमारत जुनी असल्यामुळे भिंतींना वाळवी खाऊ लागली. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये झाडेझुडपे डोकावू लागली. एखाद्या भूतबंगल्यासारखी या शाळेची अवस्था झाली होती.  

शाळा सुरू करण्यासंदर्भात समाजसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधींची पत्रे शिक्षण विभागाकडे येऊ लागली. शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा व्हायची. निधी नाही, शिक्षक नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थीच नाही. तर शाळा सुरू करायची कशी, असा प्रश्‍न होता. अखेर पाचवीचा सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. मंगलमूर्ती सयाम या शिक्षकाने या बंद पडलेल्या शाळेत स्वतःच्या मुलीला टाकले आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीने शिक्षक आणि इतर मंडळी उभी झाली. एकूण सतरापैकी निम्मे विद्यार्थी शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची अपत्ये आहेत. 

शिक्षकांकडूनच साफसफाई
विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात मंगलमूर्ती सयाम या शिक्षकाचा हातखंडा आहे. त्यांना देवरीतील जिल्हा परिषद शाळेत पाचारण करण्यात आले. शाळेची अवस्था बघून त्यांनी स्वतःच कंबर कसली. आशिष वागदेवे या सहकारी शिक्षकाच्या मदतीने खिशातील पैसा टाकून काम सुरू केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher start school