अभिनंदनीय! शाळा बंद पण अभ्यास सुरू, नदी, नाले तुडवत शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

पराग भानारकर
Saturday, 19 September 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसरकारने १५ मार्चपासून शाळा बंद केल्या. केंद्र शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले.
 

नागभीड (चंद्रपूर) : नागभीड तालुक्‍यातील कानपा येथील आश्रमशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. परंतु कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. दुर्गम भागात आॅनलाइनची सोय नाही. त्यामुळे नदी, नाले तुडवत आणि पायी चालत शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पुस्तके पोहोचवली.

नागभीड तालुक्‍यात कानपा येथे मातोश्री लक्ष्मीबाई आदिवासी प्राथमिक आणि आश्रम शाळा, स्व.वासुदेवराव पाथोडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे. याठिकाणी जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसरकारने १५ मार्चपासून शाळा बंद केल्या. केंद्र शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले.

या शाळेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, सिरोंचा, आरमोरी, वडसा, एटापल्ली या तालुक्‍यातील ८५ गावातील दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. शहर भागात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची सोय करण्यात आली. मात्र दुर्गम भागात इंटरनेटची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे यांच्या सूचनेनुसार विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी प्राचार्य निकुरे यांनी समुपदेशकांची नियुक्ती केली. शिक्षकांना त्यांच्या संपर्कात ठेवून शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले. ज्या भागात नेटवर्क उपलब्ध आहे. त्या भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम केले.

सविस्तर वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

जिल्हाबंदी संपल्यानंतर प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास चारही तालुक्‍यातील ८५ गावांमधील २०० विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला. पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवित असताना अनेक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी शिक्षकांनी स्थानिक गावकऱ्यांची मदत घेतली. डोक्‍यावर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन नदी,नाले पार करावे लागले. दुर्गम आणि डोंगराळ भागात ४ ते ५ किलोमीटर पायी डोक्‍यावर पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचावे लागले. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers deliver books in students places