शिक्षकी पेशाला विद्यार्थ्यांचा ठेंगा; नोकरीची हमी नसल्याने फिरविली पाठ

साईनाथ सोनटक्के 
Thursday, 13 August 2020

विद्यार्थ्यांचा डीएलएडच्या अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा बघून खासगी अध्यापक विद्यालये सुरू झाली. आजघडीला जिल्ह्यात 33 खासगी विद्यालये आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान फेरीनुसार नोंद झाल्यानंतर संबंधित अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला जात होता.

चंद्रपूर : जीवनात गुरूला आजही मोठे स्थान आहे. यातूनच या क्षेत्रात जाणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. आधी दहावीच्या आणि आता बारावीच्या निकालानंतर डीएलएडच्या अभ्यासक्रमाला निवड होण्यासाठी फेरी पद्धत वापरली जायची. त्या फेरीतून निवड झालेल्या अध्यापक विद्यालयांत प्रवेश निश्‍चित केला जात होता. मात्र, मागील काही वर्षांत डीएलएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे आता कुणीही या अन्‌ प्रवेश घ्या, अशी काहीशी स्थिती या अभ्यासक्रमासंदर्भात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमाला आधी डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन), नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) आणि आता डीएलएड (डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने ओळखला जातो. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आधी नोकरीची हमखास हमी होती. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळायचे. चंद्रपूर जिल्हास्थानी असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र (डाएट) हे शासनमान्य विद्यालय आहे. तर, जनता शिक्षण अध्यापक विद्यालयाला शासनाचे अनुदान आहे. यात प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या विद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असायची.
विद्यार्थ्यांचा डीएलएडच्या अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा बघून खासगी अध्यापक विद्यालये सुरू झाली. आजघडीला जिल्ह्यात 33 खासगी विद्यालये आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान फेरीनुसार नोंद झाल्यानंतर संबंधित अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला जात होता. मात्र, काही वर्षांनंतर या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे खासगी अध्यापक विद्यालये बंदस्थितीत आहेत. तर, शासकीय आणि अनुदानित अध्यापक विद्यालयांमध्येही हमखासपणे प्रवेश मिळू लागला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आता ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते. ऑनलाइन नोंदणीनंतर अवघ्या 10 मिनिटांत प्रवेश निश्‍चित होत आहे. मात्र, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असल्याने आता कुणीही या अन्‌ प्रवेश घ्या अशीच काहीशी स्थिती बघायला मिळत आहे.
शिक्षण क्षेत्रात मागील काही वर्षांत मोठा बदल झाला. अनेक विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रातील पदवीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले. काही वर्षांच्या परिश्रमानंतर नोकरीची हमी वाटू लागली. त्यात डीएलएडच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीईटी, टीईटी सारख्या परीक्षांचे अडथळे निर्माण करण्यात आले. यानंतरही राज्यात शिक्षक भरती कधी होईल, हे कुणीही निश्‍चित सांगू शकत नव्हते. त्यामुळे बेभरवशाचे शिक्षण असे विद्यार्थ्यांना वाटू लागले. यातून विद्यार्थ्यांनी या शिक्षणाकडे पाठ फिरविली आहे. 

हे वाचा— कापूस खरेदी : शेतकरी सुखावला; तब्बल इतक्या कोटी क्विंटल खरेदी

 

खासगी अध्यापक विद्यालये संकटात
डीएलएडचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा आधी मोठा कल होता. यातून जिल्ह्यात सुमारे 33 खासगी अध्यापक विद्यालये सुरू झाली. मात्र, नंतरच्या काळात शिक्षक भरती अनेक वर्षे बंद होती. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळणे कठीण झाले. त्यातच सीईटी, टीईटी सारखे अडथळे टाकण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे खासगी अध्यापक विद्यालये संकटात आली. त्यातील कंत्राटी तत्त्वावर अध्यापकांचे कार्य करणारे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यातून काहींनी दुसरा पर्याय शोधला. तर, काही कर्मचारी आजही पुन्हा चांगले दिवस येतील म्हणून मिळेल त्या मानधनात सेवा देत आहेत.

हजारो विद्यार्थी बेरोजगार
हमखास नोकरी मिळेल या आशेने हजारो विद्यार्थ्यांनी डीएलएटचे शिक्षण घेतले आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने शिक्षक भरतीसाठी सीईटी आणि शिक्षकांसाठी टीईटी या परीक्षांची अट नव्याने लागू केली. त्यामुळे हे दोन अडथळे पार करून शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. यातून हजारो विद्यार्थी बेरोजगारीचे चटके सहन करीत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकीची क्रेझ बघायला मिळत आहे. तसेच स्पर्धा परीक्षांचे दिवसेंदिवस फॅड वाढत आहे. डीएलएड अभ्यासक्रम हा आता लोकप्रिय राहिलेला नाही. त्यातूनच विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. मात्र, शिक्षकी पेशा चांगला आहे. त्यामुळे या क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी याकडे निश्‍चितपणे वळावे.
- विलास पाटील, प्राचार्य, शिक्षण व प्रशिक्षण विद्यालय, चंद्रपूर.

संपादन-चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teaching profession is dominated by students; Turned back because there is no job guarantee