esakal | गडचिरोलीच्या गिधाडांवर तेलंगणाचा डोळा
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंद झालेले अतिदुर्मीळ सिनेरिअस व ग्रिफान गिधाड.

गडचिरोलीच्या गिधाडांवर तेलंगणाचा डोळा

sakal_logo
By
मिलिंद उमरे


गडचिरोली : नामशेष होणाऱ्या अतिसंकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय सूचीत नोंद असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. हे पक्षी काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र, आता गडचिरोलीच्या या गिधाडांवर तेलंगणा सरकारची वक्रदृष्टी पडल्याने हे निसर्गाचे सफाई कामगार संकटात सापडले आहेत.
मृत प्राण्यांचे मांस खाऊन निसर्गात स्वच्छता ठेवत माणसांना जीवघेण्या जिवाणू, विषाणूजन्य आजारांपासून वाचविणारे गिधाडच आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. जगात गिधाड असलेल्या काही मोजक्‍या ठिकाणांपैकी गडचिरोली एक आहे. या जिल्ह्यात सुमारे 300 गिधाडे आहेत. जिल्ह्यात पांढऱ्या पाठीचे (व्हाइट बॅक्‍ड व्हल्चर), लांब चोचीचे (लॉंग बिल्ड व्हल्चर), इजिप्शियन व्हल्चर आढळतात. याशिवाय अलीकडेच सिनेरिअस व्हल्चर आणि ग्रिफान व्हल्चर या अतिदुर्मीळ गिधाडांची नोंद झाली. या गिधाडांना जगविण्यासाठी वनविभागासह विविध वन्यजीव संस्था व नागरिक प्रयत्न करीत आहेत. पण, तेलंगणा सरकारला आता येथील पाच जोड्या अर्थात दहा गिधाडे हवी आहेत. ही गिधाडे त्यांना हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयासाठी हवी आहेत. येथे या पक्ष्यांचे कृत्रिम प्रजोत्पादन करण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी येथे अंड्यांवर प्रक्रिया करून गिधाड प्रजोत्पादनाचा प्रयत्न झाला; पण तो सपशेल फसला होता. आपल्याकडील गिधाडे गमविणारे हे राज्य आता महाराष्ट्राच्या मागे लागले आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारनेही कोणताच विचार न करता त्यांना परवानगी दिली. सध्या गिधाड पकडण्यासाठी एक चमू जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यांना नर-मादी अशी जोडी हवी आहे. पण, गिधाडांमध्ये डीएनए चाचणीशिवाय नर-मादी ओळखताच येत नाही. म्हणजे त्यांना मोजकी गिधाडे पकडताच येणार नाहीत. गिधाडांची ठिकाणे हुडकून काढणे सोपे नाही. म्हणजे त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या घरट्यांच्या वसाहती, निवाऱ्याची स्थळे किंवा मृत जनावरे खायला जिथे उतरतात, अशा ठिकाणी त्यांना पकडण्याचे प्रयत्न होणार आहेत. हे प्रयत्न होताना गिधाडांना इजा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय काही गिधाडांना पकडण्याच्या नादात इतर गिधाडे भयग्रस्त होऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची, प्रसंगी ते आपली घरटी, त्यांना उपयुक्त असलेला जिल्ह्याचा परिसरच सोडून जाण्याची दाट शक्‍यता आहे. तेलंगणाला ही गिधाडांची भेट द्यायचे ठरवताना त्यातून काय गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे. केवळ आपल्या प्राणिसंग्रहालयाची शोभा वाढविणे आणि कृत्रिम प्रजोत्पादनाचा खेळ मांडण्यासाठी तेलंगणा सरकार हा प्रकार करत असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये रोष व्यक्त होत आहे.

वनमंत्र्यांनी लक्ष द्यावे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. वनमंत्री असल्याने राज्यातील वन आणि वन्यजीवांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आवश्‍यकता आहे. ज्याप्रमाणे वाघांसाठी चंद्रपूर जिल्हा जगप्रसिद्ध असून, तेथे पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांना लाभ झाला. तसाच लाभ गिधाडांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे पर्यटन विकासाच्या व रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

तेलंगणा सरकारने गडचिरोली जिल्ह्यातून गिधाडांच्या पाच जोड्या मागितल्या होत्या. त्यांना वरिष्ठ स्तरावरून परवानगी देण्यात आली आहे. या गिधाडांना पकडण्यासाठी एक चमू सध्या फिरत आहे.
-कुमारस्वामी, उपवनसंरक्षक, गडचिरोली.