44.2 अंश सेल्सिअससह ब्रह्मपुरी राज्यात "हॉट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

देशात सर्वाधिक तापमानाची काल नोंद झालेल्या नागपूरचा पारा आज अर्ध्या अंशाने खाली घसरला. मात्र उन्हाचे तीव्र चटके कायम होते. ब्रह्मपुरी येथे राज्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली. उन्हाच्या तडाख्यानंतर आता उद्यापासून (गुरुवार) विदर्भाला अवकाळी पावसाचाही दणका बसण्याची दाट शक्‍यता आहे.

नागपूर - देशात सर्वाधिक तापमानाची काल नोंद झालेल्या नागपूरचा पारा आज अर्ध्या अंशाने खाली घसरला. मात्र उन्हाचे तीव्र चटके कायम होते. ब्रह्मपुरी येथे राज्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली. उन्हाच्या तडाख्यानंतर आता उद्यापासून (गुरुवार) विदर्भाला अवकाळी पावसाचाही दणका बसण्याची दाट शक्‍यता आहे.

विदर्भातील उन्हाची लाट अपेक्षेप्रमाणे आजही कायम राहिली. मंगळवारच्या तुलनेत उपराजधानीचे कमाल तापमान अर्ध्या अंशाने घसरून 43.6 अंशांवर आले. त्याउपरही दिवसभर उन्हाचे जोरदार चटके जाणवले. आजचा दिवस ब्रह्मपुरीवासींसाठी तापदायक ठरला. येथील 44.2 अंश तापमान विदर्भासह राज्यातही सर्वाधिक ठरले. चंद्रपूर (43.8), अकोला (43.0), वर्धा (43.0) आणि अमरावती (42.6 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही उन्हाचे तीव्र चटके जाणवले. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या पारा सरासरी तीन ते चार अंशांनी अधिक आहे.

उन्हाची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार असली तरी, गुरुवारपासून नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस व ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Temperature Summer Heat