अफलातून! तेलंगणा, आंध्रप्रदेशातील कंत्राटदारांसोबत मोबाईलवरूनच केले तेंदूपत्ता खरेदीचे करारनामे

सुरेश नगराळे
Saturday, 30 May 2020

अनेक ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाचे निर्देश धुडकावून तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारासोबत भ्रमणध्वनीवरूनच करारनामे केले; तर काही ठिकाणी जिल्ह्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारांनी ग्रामसभा न घेताच तेंदूपत्ता विक्रीची प्रक्रिया राबविली. यामुळे मजुरांच्या मजुरीची समस्या उद्भवण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली : हजारो मजुरांच्या हाताला काम आणि ग्रामसभांना महसूल उपलब्ध करून देणाऱ्या तेंदूपत्ता हंगामाला विदर्भातील चार जिल्ह्यांत सुरुवात झाली आहे. मात्र, क्वारंटाइनच्या धास्तीने तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यातील काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी प्रत्यक्षात हजर न राहता भ्रमणध्वनीवरूनच ग्रामसभांशी तेंदूपत्ता खरेदीचे करारनामे केल्याचा अफलातून प्रकार समोर आला. यामुळे ग्रामसभा अडचणीत येणार असल्याचे बोलले जाते.

मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून कोरोना संसर्ग विरोधी पहिली टाळेबंदी व संचारबंदी घोषित झाली. यानंतर प्रशासनाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायती व ग्रामसभांना सूचना देऊन तेंदूपत्ता संकलन प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवून त्याचा जाहीर लिलाव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारी दर्शविली होती.

मजुरांच्या मजुरीची समस्या

अनेक ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाचे निर्देश धुडकावून तेंदूपत्ता कंत्राटदारासोबत भ्रमणध्वनीवरूनच करारनामे केले; तर काही ठिकाणी जिल्ह्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारांनी ग्रामसभा न घेताच तेंदूपत्ता विक्रीची प्रक्रिया राबविली. यामुळे मजुरांच्या मजुरीची समस्या उद्भवण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

क्वारंटाइन होण्याची त्यांना होती भीती

गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्याप्रमाणात केले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या समस्येमुळे बाहेर राज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदार ग्रामसभांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले नाही. जिल्ह्यात प्रवेश केला तर 14 दिवसांसाठी क्वारंटाइन होण्याची त्यांना भीती होती. यावर उपाय म्हणून काहींनी थेट सरपंच तसेच ग्रामसभा अध्यक्षांशी संपर्क साधून तेंदूपत्त्याचे भाव ठरवले. या शिवाय तेंदूपत्त्याची अतिरिक्त पाने तोडण्याबाबतच गुप्त समझोता झाल्याची माहिती आहे.

असं घडलंच कसं? : कोरोनामुळे या व्यवसायावर आली अवकळा...

एटापल्ली तालुक्‍यातही झाला होता बनावट करारनामा

बनावट करारनाम्यामुळे चार वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्‍यात एका तेंदूपत्ता कंत्राटदाराने ग्रामसभेला सहा कोटींचा चुना लावला होता. यांसदर्भात पाठपुरावा करूनही ही रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे यंदाही तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या बनावट करारनाम्यामुळे मजुरांसोबतच ग्रामसभाही अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : धक्‍कादायक, आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची दारे बंद

सुरक्षित अंतराचा फज्जा

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुरक्षित अंतर, मास्क तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना तेंदूपत्ता संकलनासाठी दिल्या होत्या. मात्र, या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. यामुळे कोरोनाचा संसर्गाचा प्रसार होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात ग्रामसभाकडून खबरदारी घेतली जात नसल्याची ओरड केली जात आहे. तेंदूपत्ता फळीवर मजूर सुरक्षित अंतर तसेच मास्क न लावताच खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tendupatta Agreements with Telangana, Andhra Pradesh Contractors on Mobile