अमरावती : टेक्स्टाईल पार्क अमरावतीतच होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Textile park established Amravati

अमरावती : टेक्स्टाईल पार्क अमरावतीतच होणार

अमरावती : पीएम मित्रा योजनेतील टेक्स्टाईल पार्क अमरावतीलाच होणार असल्याचा दावा करतानाच माजीमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी चुकीच्या माहितीवर खोटे आरोप केल्याचा प्रत्यारोप भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी केला. डॉ. सुनील देशमुख हे विकासाचे शत्रू बनले असल्याचा आरोप करीत त्यांनी त्यांचा निषेध केला.

माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीचा प्रकल्प औरंगाबाद येथे पळविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडण करण्याकरिता भाजपने आज पत्रकार परिषद घेत प्रत्यारोप केलेत. यावेळी आमदार व माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, जयंत डेहनकर प्रामुख्याने उपस्थित होते. किरण पातूरकर यांनी अमरावतीला पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क देण्यात यावा, अशी मागणी आपण स्वतः केली होती, असाही दावा यावेळी केला. ते म्हणाले, एमआयडीसीच्या सीईओंनी १४ जूनला अमरावती व औरंगाबाद येथे या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठविला.

त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यांच्या आदेशाहूनच त्यांनी हा प्रस्ताव पाठविला असावा, असा दावा करीत तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी २५ मे रोजी अमरावतीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना पत्र पाठविले होते. त्यामुळे औरंगाबादसाठी पाठविलेला प्रस्ताव महाविकास आघाडीच्या सरकारनेच पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विदर्भद्रोही असल्याचाही आरोप पातूरकर यांनी केला. सर्व वस्तुस्थिती डॉ. सुनील देशमुख यांनी लपवून केवळ आरोप केलेत, असेही ते यावेळी म्हणाले. तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही त्यांनी टीका केली.

अमरावतीला का होणार पार्क?

अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये सीईटीपी असल्याने व औरंगाबादला ते नसल्याने अमरावतीची बाजू भक्कम आहे. टेक्स्टाईल पार्कसाठी हा सीईटीपी असणे आवश्यक असून तो उभारण्यास तीन वर्षे लागतात. अमरावतीला तो आधीच असल्याने पीएम मित्रा योजनेतील मेगा टेक्स्टाईल पार्क येथेच होणार असल्याचा दावा आमदार प्रवीण पोटे यांनी यावेळी केला.

Web Title: Textile Park Established Amravati Bjp Leader Claims

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..