esakal | ऐकावे ते नवलच! चोरट्यांनी लुटले चक्क गॅस सिलिंडरचे गोदाम
sakal

बोलून बातमी शोधा

cylinder.

गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे; घरफोडी करून सोने, नकदी रोकड चोरणे या घटना नित्याचाच आहेत.याशिवाय दरोड्यासारख्या घटनाही बरेचदा कानावर येतात. मात्र पहिल्यादांच चोरट्यांनी गोदाम फोडून घरगुती वापराचे एच.पी. कंपनीचे तब्बल १०२ गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना वरोरा तालुक्‍यातील येन्सा येथे घडली.

ऐकावे ते नवलच! चोरट्यांनी लुटले चक्क गॅस सिलिंडरचे गोदाम

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : गॅस सिलेंडरच्या टंचाईचा एक काळ होता. तेव्हा सिलेंडरसाठी नंबर लावल्यावर एकेक महिना सिलेंडरची वाट पाहावी लागत असे. अलिकडे मात्र बहुतेक घरी दोन सिलेंडर असतात. आणि नंबर लावल्यावर साधारण एक-दोन दिवसात सिलेंडर घरपोच येते. त्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार वगैरे गोष्टी कालबाह्य ठरल्या आहेत. अशात सिलेंडरची चोरी होऊ शकते, आणि ते ही एक-दोन नव्हे, तब्बल १०२ सिलेंडरची, यावर कोणी विश्वास ठेऊ शकेल का?पण हे सत्य आहे. अशी जगावेगळी चोरी चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. चोरुन नेलेल्या या १०२ सिलेडरचे चोरटे नेमके काय करणार? हाच खरा ऐरणीचा मुद्दा आहे.

गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे; घरफोडी करून सोने, नकदी रोकड चोरणे या घटना नित्याचाच आहेत.याशिवाय दरोड्यासारख्या घटनाही बरेचदा कानावर येतात. मात्र पहिल्यादांच चोरट्यांनी गोदाम फोडून घरगुती वापराचे एच.पी. कंपनीचे तब्बल १०२ गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना वरोरा तालुक्‍यातील येन्सा येथे घडली. याची तक्रार पोलिसात केली आहे.

चंद्रपुरातील प्रतीक डोर्लीकर यांची वरोरा तालुक्‍यातील बोर्डा येथील गुरूमाऊली नगर येथे प्रतीक एच.पी. गॅस एजन्सी आहे. गोडाऊन येन्सा येथे आहे. पाच सप्टेंबरला सकाळी ३०६ सिलेंडर भरलेला ट्रक येन्सा येथील गोदामात आला. या गोदामात आधीचे १९ सिलेंडर असे एकूण ३२५ सिलेंडर होते. त्यापैकी ५८ गॅस सिलेंडरची विक्री केली. सायंकाळी चौकीदार दिलीप चावरे यांनी डोर्लीकर यांच्या भ्रमणध्वनीवर २६७ सिलेंडर शिल्लक असल्याचा संदेश पाठविला. त्यानंतर गोदामाला टाळे लावून चौकीदार घरी गेला.

सविस्तर वाचा - ही तर सरकारचीच जबाबदारी; नकार मान्य केला जाऊ शकत नाही, वाचा


रात्री गोदामात चौकीदार नसतो. याचा फायदा चोरट्यांनी उचलला. सहा सप्टेंबरला सकाळी गोदाम उघडल्यानंतर सुरक्षा भिंतीचे द्वार, गोदामाचे मागचे दार तोडून १०२ घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे लक्षात आले. त्याची किंमत दोन लाख ३८ हजार २५० रुपये आहे. याची तक्रार वरोरा पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top