अबब! ; चक्क शासकीय शवविच्छेदनगृहच गेले चोरीला

गुलाबराव इंगळे
Saturday, 11 July 2020

विहिर चोरीला गेली म्हणुन शोधू आणा या थीमवर आधारीत असलेला जाऊ तिथं खाऊ नावाचा मराठी सिनेमा तुम्ही बघितला असेल. मात्र, जळगाव जामोद येथे चक्क शासकीय शवविच्छेदन गृहच चोरीला गेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जळगाव(जामोद)   ः विहिर चोरीला गेली म्हणुन शोधू आणा या थीमवर आधारीत असलेला जाऊ तिथं खाऊ नावाचा मराठी सिनेमा तुम्ही बघितला असेल. मात्र, जळगाव जामोद येथे चक्क शासकीय शवविच्छेदन गृहच चोरीला गेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जामोद परिसराचा सर्व प्रशासकीय कारभार सध्या "अंधेर नगरी चौकट राजा" असा सुरू असून जनमानसाचा प्रशासनवरील विश्वास उडाला आहे. कितीही तक्रारी केल्या तरी प्रशासन नोंद घ्यायलाच तयार नाही .शहरालगत शासकीय आरोग्य विभागाची नांदुरा मार्गावर इंग्रज कालीन शवविच्छेदन गृहाची इमारत कार्यरत होती. त्या शवविच्छेदन गृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पावसाळ्याचे दिवसात ती गळत असल्यामुळे डॉक्‍टरांना त्रास सहन करावा लागत होता. याची जाण डॉक्‍टर मंडळींनी तत्कालीन जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील यांना करून दिल्यावर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेतून आठ लाखाहून अधिक रक्कम खर्चून नूतनीकरण करण्यात आलेले . एनआरएचएमचे उपअभियंता राजपूत आणि त्यांचे सहकारी नाईक यांनी यावेळी सुमारे आठ लक्ष रुपयांची तरतूद केली होती असे कळते. या गोष्टीला केवळ दहा वर्षे उलटले असून, सध्या ही इमारत त्या सर्वे नंबरमध्ये अस्तित्वातच नसून, हे शवविच्छेदन गृह चोरी गेल्याची तक्रार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कॉम्रेड विजय पोहनकर यांनी दोन महिन्यापूर्वी देऊनही प्रशासनाने कागदी घोडे नाचवल्या शिवाय काहीही कार्यवाही केली नाही .

अखेर तक्रार कर्त्यानेय तीव्र आंदोलनाची भाषा बोलल्या नंतर दिनांक सात जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकरराव वानखडे यांनी शवविच्छेदनगृह चोरी गेल्याची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशनला दिल्याने प्रशासनासह सदर घटनेची ज्यांचे लागेबांधे आहेत. अशा सर्व

राजकीय,अराजकीय तसेच इस्टेट ब्रोकर दलालांची झोप उडाली आहे. सदर शवविच्छेदन गृह हे प्रशस्त अशा जागेमध्ये होते. किमान चार हजार स्केअर फुटावर असल्याची शासकीय दप्तरी नोंद आढळली नंतर अचानक इस्टेट ब्रोकर मंडळींनी रातोरात दलालांमार्फत सदर शवविच्छेदन इमारतीची विल्हेवाट लावली,किमान सहा महिन्यापूर्वीच ही विल्हेवाट लागली असून, त्या जागेवर खडीकरण ,दबाई, लेव्हलिंग करून तो परिसर विस्तारित केल्यामुळे इथं त्यापूर्वी कोणतीच इमारत नसावी असा भास होतो .

त्यामुळे पोहनकर यांनी सदर शवविच्छेदनगृह चोरी गेल्याची वारंवार उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे ,तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसकाळ,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकरराव वानखडे यांचे सह कित्येक वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली .ह्याविषयी त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे लिखाण करूनही उपयोग न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याची भाषा केल्यानंतर एक नाममात्र तक्रार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखडे यांनी दाखल केली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम 379 भांदवि नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुनील जाधव यांचे मार्गदर्शन पोहेकॉ कुसुंबे पो कॉ निंबाळकर हे करीत आहेत.

तपास अधिकारी संशयास्पद
सदर शवविच्छेदन गृहाची इमारत शासनाच्या कोणत्याही परवानगीविना काही हितशत्रूंनी उद्‌वस्त केली. त्या इमारतीच्या जागेचासुद्धा अन्यत्र व्यक्तीशी सौदा चिठ्ठी केली. हा कोट्यावधींचा घोटाळा असताना एका साध्या पोलिस कॉन्स्टेबलकडे फक्त राजकीय दबावात ठाणेदार यांनी हा तपास देणे हे सुद्धा संशयास्पद आहे. कुसुंबे त्यांच्याकडे आतापर्यंत जेवढे ही तपास गेले त्यापैकी फारच कमी तपास पूर्णत्वास गेले. बाकी सर्व तपासाची लेनदेन करून विल्हेवाट त्यांनी केलेली आहे. त्यामुळे अशा संशय व्यक्तींकडे एवढ्यात गंभीर प्रकरणाचा तपास देणे हे सुद्धा संशयास्पद असल्याचे बोलले जाते. सदर इमारत ही कोणी पाडली, त्यासाठी कोणाची जेसीबी मशीन होती, कोणता इस्टेट भोकर तिथे उपस्थित होता, हे सर्व तक्रार कर्त्याला व पोलिस विभागाला ज्ञात आहे. त्यामुळे तपास सोडून इतर बाबीकडे कुसुंबे यांचा मोर्चा वळला तर त्यात काही वावगे ठरू नये.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The theft took place at the government mortuary, Finally, a case was registered at Jalgaon Jamod police station