
कोरोना काळातील वीज बिल सरकारने संपवावे. अन्यथा कोणीही वीज बिल भरू नका. वीज कनेक्शन कापण्यात आल्यास त्याचा सामूहिक रित्या विरोध करा. जर का तुम्ही घरी नसताना वीज कापली तर ती पुन्हा स्वतः जोडून द्यावी, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केले.
देवरी (गोंदिया) : येथील वीज विदर्भात तयार होते. कोरोना काळात सर्व उद्योग धंदे, व्यापार बंद होते. जनतेकडे पैसेच नव्हते. नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट म्हणून सरकारने कोरोना काळातील जनतेचे संपूर्ण वीज बिल भरून संकटग्रस्त विदर्भीय जनतेला सहकार्य करुण दिलासा देणे ही सरकारची नैतिक कर्तव्य आहे. परंतु, ऊर्जामंत्री वीज कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही असे सांगतात. तेव्हा कोरोना काळातील वीज बिल सरकारने संपवावे. अन्यथा कोणीही वीज बिल भरू नका. वीज कनेक्शन कापण्यात आल्यास त्याचा सामूहिक रित्या विरोध करा. जर का तुम्ही घरी नसताना वीज कापली तर ती पुन्हा स्वतः जोडून द्यावी, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची देवरी तालुका कार्यकर्त्यांची बैठक येथील मॉं धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, देवरी तालुका अध्यक्ष अँड. पुष्पकुमार गंगाबोईर, तालुका संपर्क प्रमुख कैलास घासले, लालचंद भोयर, तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख अश्विनी कोरोटी, दिया उईके, खुशी नळपते यांच्या सह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.
श्री. नेवले पुढे म्हणाले, विदर्भात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यात 33 टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांच्या नुकसान भरपाई पोटी 25 हजार रुपये प्रती हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि सोबतच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी. या मागणीला धरून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या 7 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण विदर्भभर 11 जिल्ह्यामधील 120 तालुक्यामध्ये ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 4 जानेवारी 2021 रोजी राज्याचे वीज मंत्री नितीन राऊत त्यांच्या नागपूर येथील घराला घेराव करण्यात येणार असून तरी दोन्ही आंदोलन देवरी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर 7 डिसेंबरला ठिय्या आंदोलन दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
तरी, या आंदोलनात जास्तीत लोकांनी सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य संयोजक राम येवले, रंजना मामर्डे व देवरी तालुका अध्यक्ष ऍड. पुष्पकुमार गंगबोईर यांनी केले आहे. या बैठकीत रंजना मामर्डे आणि ऍड. पुष्पकुमार गंगबोईर यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीचे संचालन व प्रास्ताविक ऍड. पुष्पकुमार गंगबोईर यांनी तर उपस्थितांचे आभार रंजना मामर्डे यांनी मानले.
संपादन - सुस्मिता वडतिले