esakal | या जिल्ह्यातील तब्बल 193 महिला, मुली बेपत्ताच
sakal

बोलून बातमी शोधा

There are 193 women and girls missing in this district

गेल्या दोन वर्षात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून हजाराहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्‍याचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्‍थित झाला असून यापैकी अद्यापही 193 महिला, मुलीं बेपत्ताच असल्‍याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिलांना शोधण्यात अपयशी ठरल्‍याबद्दल पोलिस यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित झाले आहे. 

या जिल्ह्यातील तब्बल 193 महिला, मुली बेपत्ताच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : गेल्या दोन वर्षात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून हजाराहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्‍याचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्‍थित झाला असून यापैकी अद्यापही 193 महिला, मुलीं बेपत्ताच असल्‍याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिलांना शोधण्यात अपयशी ठरल्‍याबद्दल पोलिस यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित झाले आहे. 


विशेष म्‍हणजे 31 बेपत्ता मुलींच्‍या शोधात चालढकल केल्‍याने शेजारी अकोला जिल्‍ह्‍यात जिल्‍हा पाेलिस अधिक्षकांची बदली करण्यात आली असून पोलिस निरीक्षक दर्जाच्‍या महिला व पुरुष अशा दोन तपास अधिकाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.  हा प्रश्‍न आता महाराष्ट्रभर गाजल्यानंतर बुलडाणा पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. 
राष्ट्रमाता मॉ जिजाऊंचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ही बाब निश्‍चितच चिंता करायला लावणारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचे पुढे काय होत असेल याचा विचारही करणे सर्वसामान्यांसाठी कठीण आहे. याच काळात अठरा वर्षाखालील हरविलेल्या मुलींसदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी 157 गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी 125 प्रकरणात पोलिसांना यश आले तर उर्वरित 33 मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. मात्र, पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत असेच उत्तर दिले जात आहे. 
बुलडाणा जिल्हा अत्यंत संवेदनशील आहे. महिला व मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी समाजातील सर्व स्तरातील घटकांनी लेक माझी, बेटी बचाओ यासारखे उपक्रम राबविले आहे. मात्र, तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिस यंत्रणेने ही प्रकरणे अधिक गांभीर्याने व जलद गतीने उघड करण्याची गरज आहे. यासोबतच स्त्रीयांवरील अत्याचारांच्या प्रकारांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. 2018 मध्ये  758 तर 2019 मध्ये 751 अशी सुमारे दीड हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये महिलांचे खुन, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, मुलींना पळवून नेणे, विवाहीतेचा छळ अशा प्रकरणांचा समावेश आहे. महिला व मुलींना पळवून नेण्याची 75 प्रकरणे 2018 मध्ये तर 84 प्रकरणे 2019 मध्ये घडली आहेत. एकंदरीतच या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून या घटना कशा थांबतील यासाठी अधिक कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

प्रकरणांचा शोध लवकरच
या दोन वर्षात झालेल्या 1023 प्रकरणांपैकी 830 महिला व मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अशा घटना घडू नयेत यासाठी ‘कळी उमलताना’ हा प्रकल्प ‘प्रतिसाद’ नावाचे मोबाइल अ‍ॅप दामिनी पथक, स्वयंसिध्दा निर्भया पथक, पोलिस काका पोलिस दिदी यासारखे उपक्रम राबविले आहेत. उर्वरीत प्रकरणांचा शोध लवकर लावण्यासाठी देखील पोलिस प्रयत्नशील आहेत.
-डॉ.दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा

पोलिस अपयशी
जिजाऊंचा जिल्हा असलेल्या या जिल्ह्यात दोन वर्षात एक हजारावर महिला व मुली बेपत्ता होतात ही अत्यंत गंभीर बाब आहे. अद्यापही सुमारे 200 मुलींचा शोध लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. अशा लेकीबाळींचे पुढे काय होते हा मोठा सामाजिक प्रश्‍न बनला आहे. शासनाने याची गंभीर दखल न घेतल्‍यास मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
-श्‍वेताताई महाले, आमदार

loading image