स्थापत्यकलेचा वारसा जपणारे गरुडखांब पाहिलेत का?...चला मग पवनीला

पवनी : मुरलीधर मंदिरासमोरच्या गरुड खांबावरील श्री गरुड आणि हनुमंत यांच्या कोरीव मूर्ती.
पवनी : मुरलीधर मंदिरासमोरच्या गरुड खांबावरील श्री गरुड आणि हनुमंत यांच्या कोरीव मूर्ती.

पवनी (जि. भंडारा) : पवन राजाने वसविलेले पद्मावतीनगर म्हणजेच आजचे पवनी नगर होय. कोषापासून निर्मित तलम रेशमी वस्त्रे, विड्याची पाने या वैशिष्ट्यांसाठी या नगराची जुनी ओळख काळाच्या ओघात आता पुसली जात आहे. मात्र, वैनगंगेच्या काठावरील शेकडो मंदिरांच्या बहुलतेमुळे विदर्भाची काशी असे पुण्यक्षेत्र होण्याचे भाग्य या नगराला लाभले आहे. तथापि, आणखी एका विशेष पण; दुर्लक्षित वारशासाठी हे शहर प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गरुड खांब.

एक-दोन नव्हे तर वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेर स्थापित केलेले तब्बल दहा नक्षीदार गरुडखांब या नगराचे सौंदर्य व शोभा वाढवीत मोठ्या डौलात उभे असूनही दुर्लक्षित आहेत. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले गरुडखांब अग्निजन्य खडक आणि वाळूकांस्य खडकापासून बनविलेले आहेत. गरुड खांबावर विष्णूच्या दशावताराचे प्रसंग कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक पौराणिक कथांचा बोध गरुडखांबावर कोरलेल्या आकृत्यांमधून होतो. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट वारसा असणारे हे खांब ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत आजही खंबीरपणे उभे आहेत. पवनीशिवाय नागपूर, भिवापूर, अंभोरा येथे गरुड खांब पाहायला मिळतात.

गरुडखांबाची वैशिष्ट्ये

पवनी येथे सद्यःस्थितीत 10 गरुडखांब आहेत. गरुडखांबाची रचना ही एखाद्या मंदिराप्रमाणे केल्याचे दिसते. प्रत्येक गरुडखांबाला कळस व त्यावर ध्वजा आहे. मंडपासाठी आधार आहे. खांबावर देवदेवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. यात श्रीगणेश, गरुड, हनुमान, श्रीमत्स्य, कच्छ वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, अश्‍वमेधाचा अश्‍व, समुद्रमंथन, कृष्ण-यशोदा दधिमंथन, पारिजातक, श्रावणबाळ, शेषशायी विष्णू, सूर्य, इंद्र, शिवपार्वती, हंसारुढ सरस्वती, व्यंकटेश बालाजी इत्यादी शैव गाणपत्य, शाक्त, वैष्णव (भागवत) अनुयायांच्या भक्ती सुरेख मिलाफ व संगम गरुडखांबातून प्रदर्शित होतो. तसेच श्रीविष्णूच्या अवतार लीळा, विष्णूवाहन गरुड व हनुमंताच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. विष्णूभक्तींचे प्रतिबिंब गरुडखांबात प्रभावीपणे दिसून येते.


निर्मितीचा इतिहास रंजक

गरुडखांब निर्मितीचा इतिहाससुद्धा बराच रंजक आहे. इ. स. 270 ते 550 या कालावधीत वाकाटक वंशांचे राज्य विदर्भावर होते. या वंशातील राजे विद्या, कला, स्थापत्य व धर्मप्रेमी होते. त्यांच्या काळातच रामटेक येथील श्रीनृसिंह, त्रिविक्रम पवनी येथील शिवमंदिरांची निर्मिती करण्यात आली. गरुडखांबसुद्धा त्यांच्या अभिरुचीची साक्ष देतात. वाकाटक राजे हे शिवोपासक असले; तरी द्वितीय रुद्रसेन व त्याची पत्नी प्रभावती गुप्त ही विष्णुपासक होते. त्यामुळे विष्णुमंदिरे बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला असा कयास आहे.

दहा गरुडखांब असलेले शहर

पवनीत एकूण दहा गरुड खांब आहेत. भाईतलावाच्या उंच पाळीवर असलेल्या शिवालयासमोर पहिला गरुडखांब आहे. दिवाणघाटाकडे जाताना चौरस्त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा कळस असणारे शिवालय असून श्री. बावनकर यांच्या मळ्यालगत दुसरा गरुडखांब आहे. खिडकीच्या मार्गाने गेल्यास श्री. गोटाफोडे यांच्या शिवालयाजवळ तिसरा गरुडखांब आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सर्वतोभद्र पंचमुखी गणेश मंदिराच्या आवारात चौथा खांब आहे. श्रीविठ्ठल देवालयाच्या बाजूला पाचवा गरुडखांब आहे. श्री मुरलीधर देवालयासमोर सहावा गरुडखांब आहे. या गरुडखांबावरील श्री. गरुड आणि हनुमंत यांच्या मूर्ती खांबाच्या चौरस भागातून उठाव देऊन कोरल्या आहेत. श्रीराम मंदिराच्या आवारात सातवा खांब आहे. मंडपाचे चारही दिशांचा आधार हा खांब आहे. येथील जोडमूर्ती, घंटिका, कळस, ध्वजा, खांब, चौथरा सुस्थितीत आहे. सोमवारीपेठेत शिवालयासमोर आठवा व नववा गरुडखांब आहे. यालाच पवनीवासी बालाजी मंदिर म्हणून ओळखतात. याच मार्गावर पुढे डॉ. ठक्कर यांच्या घरासमोर दहा गरुडखांब आहे. अष्टकोनी मंडप हे या गरुडखांबाचे वैशिष्ट्य आहे. आठही दिशांना आधारमूर्ती आणि आधारशलाका आहेत. कळस आणि ध्वजा असलेल्या गरुडखांबासमोर हुनमंत व गरुड हात जोडून उभे आहेत.


तिरुपती बालाजी, विष्णुकांचीपेक्षाही अधिक

दहा गरुडखांब हे दक्षिणकाशी असलेल्या पवनीचे अनोखे विशेष आहे. श्रीविष्णूंचे स्थान असलेले तिरुपती बालाजी व विष्णूकांचीतही इतके गरुडखांब नाहीत. ब्राह्मणांनी यज्ञ केलेल्या ठिकाणी खांब उभारल्याचा समज आहे. हे गरुडखांब उभारल्यानंतर किंवा तत्पूर्वी हे यज्ञयाग केले असावेत. प्रभावतीगुप्त हिने 13 वर्षे विदर्भाचा राज्यकारभार पाहिला. मेघदूत रचियेता कालिदास तिचा अमात्य होता. कदाचित त्यांच्या सल्ल्यावरुनही ही गरुडखांबे पवनीला उभारली असावी, असे मत डॉ. प्रभाकर आग्रे यांनी वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनावरील पुस्तकात आपल्या पवनीसंदर्भातील अभ्यासपूर्ण अनुभवातून नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com