मदतकार्यात येतोय अडचणीचा डोंगर

भामरागड : साहित्य पोहोचवण्यासाठी जाणारा ट्रॅक्‍टर रस्त्यात फसला.
भामरागड : साहित्य पोहोचवण्यासाठी जाणारा ट्रॅक्‍टर रस्त्यात फसला.

भामरागड (गडचिरोली) : जिल्ह्यात यंदा पावसाने अनेक भागांत हाहाकार माजवला. महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे, तर दुसरीकडे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भामरागड तालुक्‍यात मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, रस्ते व पुलाच्या समस्येमुळे मदतकार्यात प्रचंड कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पर्लकोटा व पामुलगौतम नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्‍यात प्रचंड नुकसान झाले असून पुरात जनावरे, अन्न, धान्य, कपडे, भांडे वाहून गेल्याने पूरपीडितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडीचशेच्यावर घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नदी व नाले पाण्याने तुडुंब भरले असून गावातील विहिरीत पुराचे पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी तसेच आरोग्याची समस्या पूरग्रस्तांना भेडसावत आहे. भामरागड तालुक्‍यात मागील चार दिवसांपासून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. महसुल विभागाचे कर्मचारी या कामात गुंतले असून तहसीलदार कैलाश अंडील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
ज्या नागरिकांचे सर्वकाही पुरात वाहून गेले त्या लोकांचा सध्या गावकऱ्यांच्या मदतीने उदरनिर्वाह सुरू असून सामाजिक संस्था, संघटनांकडून आलेली मदत पोहोचविण्याचे काम जोमाने सुरू मात्र, खराब रस्ते व नाल्याच्या पाण्यामुळे अडचणी येत आहेत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भामरागड येथे पूरपरिस्थितीने ओढवलेल्या प्रसंगाने पूरपीडितांना सर्वतोपरी मदतीचा ओघ सुरू आहे. संस्था, संघटना, महिला मंडळ, व्यापारी संघटना, लोकबिरादरी प्रकल्प, शाळा, महाविद्यालयांकडून मदत करण्यात आली. अन्न, धान्य, कपडे पूरग्रस्त गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
आरोग्याची विशेष काळजी
पूरपरिस्थितीमुळे उद्‌भवलेल्या आरोग्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या 15 डॉक्‍टरांचे एक पथक गावागावांत फिरून नागरिकांवर उपचार करीत आहे. याशिवाय पूरामुळे दूषित झालेल्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाणी स्वच्छ केले जात आहे. जलजन्य, संसर्गजन्य रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी भामरागड तालुक्‍यात मागील चार दिवसांपासून गावभेटी देत आहेत. औषधीसाठ्यासह डॉक्‍टरांच्या पथकांकडून तथा सामाजिक संस्थांकडूनही मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com