आधीच खड्डे, त्यात चिखल, रांगी-निमगाव मार्गावरून प्रवास करायचा तरी कसा ?

भाविकदास करमनकर
Wednesday, 15 July 2020

तालुक्‍यातील रांगी ते निमगाव मार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने असंख्य खड्डे पडले आहेत. त्यात आता पावसामुळे हा रस्ता चिखलाने बरबटला असून मार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून पडले आहेत. त्यामुळे या मार्गाने जायचे तरी कसे, असा प्रश्‍न वाहनचालक व प्रवासी विचारत आहेत.
 

धानोरा (जि. गडचिरोली) : रस्त्यांच्या समस्या नेहमीच्याच. नादुरुस्त रस्त्‌ आणि त्यामुळे होणारे अपघात नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले. एकीकडे महामार्गाची कामे जोरकसपणे होत असताना गाव-खेड्यातील रस्त्यांच्या नशिबी दूर्लक्षच आहे.

तालुक्‍यातील रांगी ते निमगाव मार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने असंख्य खड्डे पडले आहेत. त्यात आता पावसामुळे हा रस्ता चिखलाने बरबटला असून मार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून पडले आहेत. त्यामुळे या मार्गाने जायचे तरी कसे, असा प्रश्‍न वाहनचालक व प्रवासी विचारत आहेत.

रांगी ते बोरीफाट्यापासून निमगाव गावापर्यंत अंदाजे दोन किमी अंतराचे मार्च 2020 ला डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. मात्र, हे काम अपूर्ण असल्याने डांबरीकरण न झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून या खड्ड्यांचे रूपांतर डबक्‍यात होत आहे. या डबक्‍यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बोरी फाट्यापासून निमगावपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरून आवागमन करणे म्हणजे तारेवरची कसरतच होती.

ही कसरत आताही नागरिकांना करावी लागत आहे. रांगी ते निमगाव अंतर 4 किलोमीटर असून बोरी फाट्यापासून निमगाव पर्यंतचे अंतर 2 किमी आहे . येथूनच डांबरीकरण केले खरे पण एवढ्याच अंतरात 200 फूट अंतर डांबरीकरण न करता तसेच सोडण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील डांबरीकरण न झालेल्या भागात खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. येथील खड्डे बुजवून उर्वरीत डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

धानोरा येथील बांधकाम अभियंत्यांनी लोकांच्या मागणीची दखल घेत या मार्गाचे मोजमाप करून अंदाजपत्रक तयार केले. त्यानंतर खासगी कंत्राटदाराकडून डांबरीकरण पूर्ण करून घेतले. मात्र हे काम करताना नेमके दोन किमी अंतरात 200 फूट अंतर डांबरीकरण न करता तसेच सोडून देण्यात आले. या मागचे कारण काय, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा असलेल्या लोकांची मागणी पूर्ण झाली असली, तरी त्यांची समस्या न सुटता उलट डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा - अरेच्चा! तो झाला प्रेयसी असलेल्या महिला पोलिसासह क्‍वारंटाईन अन्‌ बायको गेली पतीच्या शोधात पोलिस ठाण्यात

...तर जबाबदारी कुणाची ?
या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडून नेहमीच अपघात घडत असतात. एरवी येथे किरकोळ अपघात होत असले, तरी या खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडला आणि त्यात एखाद्याचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्‍नही नागरिक विचारत आहेत.

 

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no asphalt road in Gadchiroli district